विद्यापीठाचा बांबू प्रकल्प बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:31 PM2019-01-23T22:31:56+5:302019-01-23T22:32:20+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून बांबू हस्तकला व कला केंद्र (भाऊ) सुरू करण्यात आले. मात्र, हा प्रकल्प केवळ उद्घाटनापुरताच ठरला असून, हल्ली हा प्रकल्प केंद्र बेवारस स्थितीत पडलेला आहे. यातील मशिनरी व अन्य साहित्य धूळखात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून बांबू हस्तकला व कला केंद्र (भाऊ) सुरू करण्यात आले. मात्र, हा प्रकल्प केवळ उद्घाटनापुरताच ठरला असून, हल्ली हा प्रकल्प केंद्र बेवारस स्थितीत पडलेला आहे. यातील मशिनरी व अन्य साहित्य धूळखात आहे.
पुणे येथून ५ आॅक्टोबर २०१८ रोजी बांबू हस्तकला व कला केंद्राचा शुभारंभ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आला. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एकाचवेळी बांबू प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. मात्र, साडेतीन महिन्यांनंतर बांबू केंद्राकडे कोणीही जाऊन पाहिले नाही. ही वास्तू तशीच उभी असून, ‘भाऊ’ला काहीतरी होईल, याची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पातून बांबू प्रशिक्षण, साहित्य, वस्तू तयार करून बाजारपेठ निर्मितीचे उद्दिष्ट होते. मात्र, बांबू ट्रीटमेंट प्लॉटअभावी हा प्रकल्प जैसे थे आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अवानिधी लागला. मशिनरी तशाच पडून आहेत. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडून पुढे कोणत्याही गाईडलाईन मिळालेल्या नाहीत. बांबू बोर्डाच्या माध्यमातून या केंद्राला तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. तसेच या केंद्रात किमान २० विद्यार्थ्यांना बांबूपासून साहित्य, वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देखील तज्ञ्जांकडून देण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, बांबू प्रकल्पाचे काम पुढे का सरकत नाही, हासुद्धा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू करून विद्यापीठाने काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना व कौशल्य अवगत व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील हा प्रकल्प सुरू होण्याची उत्सुकता लागलेली असल्याचे दिसून येत आहे.
बांबू प्रकल्पात कोर्स वर्क
अमरावती विद्यापीठाच्या बांबू हस्तकला व कला केंद्रात कोर्स वर्क सुरू केले जाणार आहे. त्याकरिता एमएससीए पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असणार आहे. पहिली बॅच १० विद्यार्थ्यांची असून, मेरीटनुसार प्रवेशाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर दुसरी बॅच प्रवेशित होईल. ५५ व ६० दिवसांचे बांबू प्रकल्पात कोर्स वर्क शिकविले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे बांबू केंद्रप्रमुख प्रशांत गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.