नोकरीची बतावणी करुन महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 05:53 PM2022-01-27T17:53:09+5:302022-01-27T17:57:48+5:30
महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती त्याच्या कार्यालयात त्याला जाब विचारण्यास जात होती. त्यावर येथे भांडू नका. आपण घरी बसून त्यावर तोडगा काढू, तुला नोकरीदेखील लावून देतो, अशी बतावणी आरोपीने केली होती.
अमरावती : नोकरी लावून देण्याची बतावणी करून एका महिलेवर शारीरिक अत्याचारासोबतच अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१९ ते १६ जून २०२० या कालावधीत या घटना घडल्याची तक्रार नोंदविण्यात आली. याप्रकरणी २५ जानेवारी रोजी संजय प्रांजळे (३८, रा. अकोला) व एक महिला अशा दोघांविरुद्ध विविध कलमांसह ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिताच्या पतीचा कार्यालयीन सहकारी म्हणून तिचा संजय प्रांजळेशी परिचय झाला. तिला विश्वासात घेऊन त्याने नोकरीचे आमिष दाखविले. २९ सप्टेंबर २०१९ रोजी पती घरी नसताना संजयने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावर न थांबता त्याने तिच्याशी अनैसर्गिक कृत्यदेखील केले. विशेष म्हणजे, तेथे प्रांजळेच्या कार्यालयातील एक महिलादेखील उपस्थित होती. कुणालाही शंका येऊ नये म्हणून प्रांजळे त्या महिलेला पीडिताच्या घरी घेऊन जायचा. तिने त्या आरोपीला मज्जाव केला नाही.
दरम्यान, या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीला सांगेल, अशी धमकी संजय प्रांजळे याने दिल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून डीसीपी विक्रम साळी व एसीपी प्रशांत राजे यांनीदेखील ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.
फिर्यादी महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती त्याच्या कार्यालयात त्याला जाब विचारण्यास जात होती. त्यावर येथे भांडू नका. आपण घरी बसून त्यावर तोडगा काढू, तुला नोकरीदेखील लावून देतो, अशी बतावणी आरोपीने केली होती. कुणाला संशय येऊ नये म्हणून तो त्याच्या महिला सहकाऱ्यासह पीडिताच्या घरी जात होता, असेदेखील फिर्यादीत नमूद असल्याची माहिती राजापेठच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रशाली काळे यांनी दिली.