विदर्भात वाघांचे मृत्यू वाढले; व्याघ्र तस्करीच्या बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 11:20 AM2022-01-31T11:20:11+5:302022-01-31T11:29:13+5:30
राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.
अमरावती : विदर्भात आकस्मिक अथवा घातपाताने वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने दिले आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर स्पीड गन लावण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने दिल्या आहेत.
राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. विदर्भातील वन्यजीवांच्या मृत्युविषयी ना. ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली होती, हे विशेष. दरम्यान, व्याघ्र प्रकल्पांच्या टायगर क्राइम सेलनेही पडद्याआड असलेल्या मध्य प्रदेशातील बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर ठेवली आहे. या टोळीच्या सदस्यांचे स्थानिकांशी हितगुज, संबंधाविषयी चाचपणी केली जात आहे.
बहेलिया टोळीचे मध्य प्रदेशातील कटनी या प्रमुख केंद्रावर टायगर क्राइम सेल लक्ष रोखून आहे. गत काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, नागपूर पोलिसांनी रेल्वे स्थानक तर गोंदियातून व्याघ्र तस्करांना अटक केली होती. विदर्भात वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी या आराेपींचे सध्या लोकेशन तपासले जात आहे. त्याकरिता व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी पोलिसांची मदत घेत आहेत.
टायगर सेल समितीची बैठक
व्याघ्रांचे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टायगर सेल समितींना बैठकी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, अधिकारी बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
आंतरजिल्हा सीमेवर वाहनांची होणार तपासणी
मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघांची शिकार, अवयवांची वाहतूक रोखण्यासाठी आंतरजिल्हा सीमेवर वाहनांची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संयुक्तपणे सीमेवर वाहनांची तपासणी करण्याची मोहीम राबवावी लागणार आहे.
वाघांचे मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. विजेच्या प्रवाहाने त्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्यात बहेलिया, बावरीया टोळी सक्रिय नाही. व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावात कोणी नवीन व्यक्ती दिसून आल्यास माहितीगाराकडून तशी माहिती प्राप्त होते.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर.