महामार्गावर विनाक्रमांकाचे ट्रक सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:57+5:30
सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आहेत. मार्गक्रमण करताना कुठलीही अडचण निर्माण होत नसल्याने अशा वाहतुकीला ज्वर चढला आहे. विशेष म्हणजे, विना क्रमांकाची वाहने धावत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : महामार्गावर अवैध गौण खनिज असो वा अवैध गोवंश वाहतूक, हा विषय आता नवीन राहिला नाही. प्रशासनाने कितीही कठोर पावले उचलली तरी या अवैध वाहतुकीची तस्करी करणारे प्रशासनाच्या दोन पावले पुढेच असल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. कारण सध्या नंबर प्लेट नसलेली अनेक जड वाहने राजरोस महामार्गावरून दैनंदिन फेऱ्या करीत आहेत. अद्याप शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही.
गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात धावणारी अवैध गौण खनिजांची वाहने आता दिवसाढवळ्या बिनधास्त मार्गक्रमण करीत आहेत. मार्गक्रमण करताना कुठलीही अडचण निर्माण होत नसल्याने अशा वाहतुकीला ज्वर चढला आहे. विशेष म्हणजे, विना क्रमांकाची वाहने धावत आहेत.
एकाच नंबरची दोन-तीन वाहने चालविण्यातही अनेक पटाईत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनाने रस्त्यावर काही अघटित घडल्यास पोलीस कारवाई कशी करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीचा उपयोग काय?
महामार्गालगत पोलीस ठाणे आहे. वाहन क्रमांकाच्या पाटीसाठी सर्वसामान्य चालकांना दंडित केले जाते. मात्र, एवढी मोठी वाहने नजरेसमोरून अप-डाऊन करीत असताना निदर्शनास येत नसतील, तर पोलीस ठाण्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचा उपयोग काय, हा प्रश्नच आहे.
महामार्गावर विना क्रमांकाची मालवाहू वाहने अद्याप निदर्शनास आली नाहीत. यानंतर कटाक्षाने लक्ष घालून अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल व वरिष्ठांना अवगत करण्यात येईल.
- शंकर मावसे,
महामार्ग वाहतूक पोलीस