अभूतपूर्व महापारायण; सव्वा लाख भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:48 PM2018-01-21T23:48:54+5:302018-01-21T23:53:16+5:30
महापारायण सोहळ्यात रविवारी रेवसानजीक तब्बल ३५ हजार भक्तांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण केले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापारायण सोहळ्यात रविवारी रेवसानजीक तब्बल ३५ हजार भक्तांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण केले. राज्यभरातून आलेल्या सव्वा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अभूतपूर्व ठरला. गजाननभक्तांच्या मांदीयाळीने संपूर्ण अमरावती शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री संत गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण सेवा समितीने रेवसानजीक हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याची मूळ संकल्पना शशिकांत पोकळे यांची आहे. काटेकोर नियोजन करण्यात आल्याने अतिशय शिस्तबद्ध पार पडलेला हा महापारायण सोहळा ऐतिहासिक ठरला आहे. पारायणासाठी २८ हजार भाविकांनी नोंदणी केली होती. मात्र, त्याहून अधिक भाविक जेथे जागा मिळेल तेथे पारायणाला बसले होते. संत गजानन महाराज यांच्यावर असीम श्रद्धा ठेवणारे महाराष्ट्रीयांसह अन्य भाषिक भक्त एकाच ठिकाणी एकत्रित आल्याने हा सोहळा विशेष कौतुकाचा ठरला. रविवारी पहाटे ४ पासून जत्थेच्या जत्थे महापारायणस्थळी दाखल झाले. त्यांना सेवेकºयांनी कडे करून मंडपात सोडले.
भव्य मंडपाच्या प्रवेशद्वारालाच गजानन महाराजांची मूर्ती होती. होमकुंड प्रज्लवित करण्यात आला होता. महापारायणास सकाळी ७.४५ वाजता सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम महापारायण समितीतर्फे गजानन महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. मंचावरून सेवा समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रधान पारायणकर्ता विद्या पडवळ यांनी मुखोद्गत पारायणास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ मंचावर उपस्थित ११ व अन्य ३५ हजार पारायणकर्ते वाचन करीत होते. एक-एक अध्यायाच्या समाप्तीनंतर श्री गजानन माउलींचा जयघोष भाविकांच्या मुख्यातून निघत होता. १२ अध्यायांचे वाचन झाल्यानंतर १५ मिनिटांचा विश्राम घेण्यात आला. त्यानंतर उर्वरित अध्याय सलग घेण्यात आले. मंडपाबाहेरही सहा हजारांवर भाविक छोट्या पुस्तिका, ग्रंथ घेऊन पारायणाला बसले होते. पारायणस्थळी दाखल लाखो भाविक गजानननामात तल्लीन झाले होते.
पारायण समाप्तीनंतर भक्तांनी आरती करून पुन्हा एकदा संत गजाननाचा जयघोष लक्षावधीच्या मुखातून झाला. पालकमंत्री प्रवीण पोटे व त्यांच्या पत्नी अनुराधा पोटे यांनी विद्या पडवळ यांच्यासह मंचावरील ११ पारायणकर्त्या महिलांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला. त्यानंतर आभार प्रदर्शन करून भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पोटे यांनी केले. गुरुवर्य सहाजी महाराज व अंबादास महाराज यांची यावेळी उपस्थिती होती.
९ हजार ७०० सेवकांचे कार्य महत्तम
महापारायण सोहळ्यात येणाऱ्या माउलींच्या भक्तांना सुविधा पुरविण्यासाठी पाच हजार सेवेकºयांची नोंदणी झाली होती. मात्र, महापारायणस्थळी तब्बल ९ हजार ७०० सेवेकºयांनी सेवा दिली. शहरातील विविध मार्गांवर थाटलेल्या चौकशी केंद्रांवर स्वयंसेवकांनी भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांना पारायणस्थळी पोहचविण्यासाठी बसची सुविधा करण्यात आली. पंचवटीपासून महापारायण स्थळापर्यंत स्वयंसेवकांचे कार्य कमालीचे धावपळीचे होते. वाहतूक नियंत्रण, पार्किंगसाठी मार्गदर्शन, चहापानाची व्यवस्था, चप्पल स्टँडची व्यवस्था अशा किरकोळ सेवादेखील स्वयंसेवकांनी आदर्शवत केल्या. परिसराच्या स्वच्छतेसाठीही ते तत्पर होते.
आरोग्य व्यवस्थाही चोख
महापारायण सोहळ्यात दूरवरून पायी चालत आल्याने काही वयोवृद्ध पुरुष व महिलांना आरोग्यविषयक समस्या जाणवली. त्यांना डॉक्टरांच्या चमूने तत्काळ आरोग्य सेवा पुरविली. त्यामुळे मधुमेह व रक्तदाबाचे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
अनवाणी भक्तांनी गाठले स्थळ
महापारायणस्थळी पोहोचण्यासाठी गजाननभक्तांनी माती, दगड व काट्यांची पर्वा न करता पारायणस्थळ गाठले. हातात विजय गं्रथ घेऊन अनेकांंनी शिवारातील मार्गाने पारायणस्थळ गाठले. विशेष म्हणजे, यामध्ये एका पायाने अपंग असणाºया व्यक्तीने दगड, माती व काट्यातून मार्ग काढत पारायणस्थळ गाठले.
२०० पोलिसांनी सांभाळली सुरक्षेची धुरा
महापारायण सोहळ्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्यांनी स्वत: पारायणस्थळी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त डाखोरे, पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पंजाब वंजारी व अर्जुन ठोसरे यांच्यासह तब्बल २०० पोलिसांनी भक्तांच्या सुरक्षेची व वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली होती. १७० पोलीस कर्मचारी, ३० महिला पोलीस व २० पोलीस अधिकारी बंदोबस्तात तैनात होते. याशिवाय १५ ते २० पोलीस वाहने गस्त लावत होते. दरम्यान, पोलिसांनी तीन पाकीटमारांना पकडले तसेच अखेरच्या टप्प्यात गर्दीत हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास बहुमोल सहकार्य केले.
उन्हात बसून पारायण
पारायणस्थळी मंडपात ३० हजार भक्तांसाठी सोय करण्यात आली होती. मात्र, पारायणकर्ता अधिक असल्यामुळे मंडपात बसायला जागाच उरली नव्हती. सुमारे सहा हजार पारायणकर्ता मंडपात इतरत्र तसेच बाहेर उन्हात बसून पारायण करीत होते. गजाननभक्तीचे हे अनोखे दृश्य अमरावतीकरांसाठी भूषणावह होते.