प्रकल्पांच्या कामात गैरप्रकार
By admin | Published: August 18, 2015 12:29 AM2015-08-18T00:29:08+5:302015-08-18T00:29:08+5:30
लहान पाटबंधारे विभागातील मांडवा, मोगर्दा, साद्राबाडी सिंचन तलावांच्या मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
कामे न करताच काढली ५० लाखांची देयके
राजेश मालवीय धारणी
लहान पाटबंधारे विभागातील मांडवा, मोगर्दा, साद्राबाडी सिंचन तलावांच्या मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. कामे न करता ५० लाखांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पाटबंधारे विभागातील मांडवा, मोगर्दा, साद्राबाडी सिंचन तलावांच्या मुख्य कालव्यांची दुरुस्ती बांधकामे, आदी कामांची विशेष दुरुस्ती न करता किरकोळ थातूर-मातूर कामे करुन मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी घेऊन संबंधित मजूर संस्था कंत्राटदार, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी संगनमताने दुरुस्तीच्या नावावर ५० लाखांची देयके काढल्याचे उजेडात आले आहे. अमरावती पाटबंधारे विभाग अमरावती अंतर्गत येथील लहान पाटबंधारे विभागाच्या सिंचन तलाव दुरुस्तीसाठी २०११ मध्ये शासनाकडून ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये मांडवा लघुसिंचन तलाव मुख्य कालव्याचे सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणासह दुरुस्तीचे काम न करताच १२ लाखांचे देयके काढले. मोगर्दा, साद्राबाडी, बेरदा सिंचनातील मुख्य कालवा दुरुस्तीची कामे करुन १३ लाखांचे देयके काढले.
हिराबंबई लघु पाटबंधारे योजना प्रकल्पांचा मुख्य कालव्याचे मातीकाम व बांधकाम न करता १५ लाख रुपये काढण्यात आले. भवर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची भिंत संरक्षण भिंतीचेही १३ लक्ष रुपये काढले. महत्त्वाच्या गडगा मध्यम प्रकल्पाच्या कामातही गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. शासन व पाटबंधारे खात्याची दिशाभूल केल्याप्रकरणी दक्षता पथकाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दुरुस्ती कामांची सखोल मोजमाप पुस्तिकेसह चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांविरुध्द नियमानुसार कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल.
- एल.पी. इंगळे,
कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती.