अवकाळी पाऊस; तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 10:24 AM2021-03-24T10:24:46+5:302021-03-24T10:25:07+5:30

Amravati news सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला.

Unseasonal rain; The effect on an area of three thousand hectares | अवकाळी पाऊस; तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

अवकाळी पाऊस; तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील मृगबहर गळाला

Next
ठळक मुद्देगहू, चणा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : सलग तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील ३८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक ३१८० हेक्टर क्षेत्रावरील संत्र्याच्या मृग बहराला फटका बसला. पाठोपाठ ५३० हेक्टर क्षेत्रातील गहू पिकाचे नुकसान झाले. २२ हेक्टरवरील भाजीपाला मातीमोल झाला. १८ ते २० मार्च दरम्यान कोसळलेल्या या अवकाळी पावसाने तालुक्यातील ४३ गावांना दणका दिला.

             मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टरवरील संत्रासह खरीप पिके नष्ट झाल्यानंतरही मोठ्या उमेदीने शेतकरी सावरले होते. मधल्या काळात कीड-रोगांमुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र, शेतकरी या संकटांमधून सावरत रबीकडे वळला होता. मात्र, आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. रबी हंगामातील संत्रा, गहू व हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार वादळासह गारपीट व पाऊस झाला. महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

             हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पुन्हा ४ दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे रबीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

सर्वाधिक नुकसान मृग बहाराचेच

जिल्ह्याच्या १४ पैकी १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान संत्रा मृग बहराचे झाल्याचा अहवाल आहे. १० तालुक्यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावरील मृग बहर गळाला. यात सर्वाधिक ५१२७ हेक्टर क्षेत्र चांदूर बाजार तालुक्यातील आहे. पाठोपाठ मोर्शी तालुक्यातील ३१८० हेक्टर, अचलपूर तालुक्यातील २९६९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट व वादळी पावसाने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला रबी पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. २२ व २३ मार्च रोजीदेखील मोर्शी तालुक्यातील अनेक गावांत ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील १०४ हेक्टरवरील चण्याचेदेखील वादळी अवकाळी पावसाने नुकसान केले.

 

पान २ चे लिड

Web Title: Unseasonal rain; The effect on an area of three thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती