अवकाळीचे नुकसान, २.९१ कोटींचे अनुदान मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:42+5:302021-06-27T04:09:42+5:30
अमरावती : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या नुकसानापोटी जिल्ह्यास वाढीव दराने २ कोटी ९१ लाख २१ हजारांची मदत येत्या आठवड्यात ...
अमरावती : ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या नुकसानापोटी जिल्ह्यास वाढीव दराने २ कोटी ९१ लाख २१ हजारांची मदत येत्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
वादळामुळे जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी वादळासह पाऊस झाला होता. यात काही तालुक्यांमध्ये घरांच्या पडझडीसह फळपिकांचे नुकसान व गुरांचा मृत्यू झाला होता. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी मदतनिधीची मागणी शासनाकडे केली होती. यामध्ये ५९६ घरांचे अंशत: नुकसान झाले. याकरिता प्रतिकुटुंब पाच हजार रुपये कपड्यांच्या मदतीसाठी व पाच हजार रुपये घरगुती भांडी घेेण्याकरिता मिळणार आहेत. याकरीता ५९.६० लाख मंजूर करण्यात आले. पूर्णत: क्षतिग्रस्त झालेल्या ३३ घरांसाठी २.३० लाख, पूर्णत: पडझड झालेल्या ३३ घरांसाठी ४९.५१ लाखांचे अनुदान मिळणार आहे.
अमरावती तालुक्यात दोन व्यक्तींना दुखापत झाली. त्यांच्यासाठी २६ हजारांची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात १९४.७५ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये जिरायती क्षेत्रात ११४ शेतकऱ्यांचे ८४.८२ हेक्टर याकरिता १३,५०० रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत ११.४६ लाख रुपये मिळणार आहेत. बहुवार्षिक पिकांचे १०९ हेक्टरमध्ये २२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याकरिता १८ हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत १९.७८ लाख व एसडीआरएफचे ३५.१८ लाखांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास केली होती. त्यानुसार आता २.९१ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले.
बॉक्स
३३ निराधार कुटुंबांना १३.३९ लाख
वादळामुळे वरूड व चांदूर बाजार तालुक्यातील ३३ कुटुंबे निराधार झाली. या कुटुंबांकरिता ३३० किलो गहू, ३३० किलो तांदूळ व ९.३४ कोटींचे अनुदान असे एकूण १३.३९ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली. त्यानुसार आता मदत देय राहणार आहे. येत्या आठवड्यात हा निधी विभागीय आयुक्तांना प्राप्त होईल व त्यानंतर जिल्ह्यास अनुदान वितरित होईल, अशी माहिती आहे.