अवेळी वीज, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर सिंचनाच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:12 AM2020-12-06T04:12:11+5:302020-12-06T04:12:11+5:30
पान २ मोर्शी : मोर्शी, वरुड तालुक्यातील गावांमध्ये महावितरणकडून होत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या भारनियमनाच्या वेळेत बदल करण्यात येऊन विद्युत ...
पान २
मोर्शी : मोर्शी, वरुड तालुक्यातील गावांमध्ये महावितरणकडून होत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या भारनियमनाच्या वेळेत बदल करण्यात येऊन विद्युत ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती करण्यात यावी, असे निवेदन विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. आनंद घोंगडे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. अवेळी वीजपुरवठा व नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर सिंचनाच्या, शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत.
शेतीच्या सिंचनासाठी महावितरणकडून दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकाला जगविण्यासाठी रात्रीला ओलीत करावे लागत आहे. मोर्शी, वरूड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विद्युत पुरवठ्याचा वेळ शेतकरीहिताचा नसून, शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. मात्र, त्याची महावितरणकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. रात्रीचा होत असलेला विद्युत पुरवठा सकाळी ६ वाजताच बंद करण्यात येतो. तो सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहावा. यावर्षी पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, कांदा, हरभरा पिकांची पेरणी केली आहे. मात्र, सिंचनासाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे शेतकरी चांगलाच त्रस्त झाला आहे. त्यांना रात्री-अपरात्री शेतात जाऊन ओलित करावे लागते. वीजपुरवठा नियमित होत नसल्याने रबी हंगामाबरोबर संत्राबागा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोर्शी, वरूड तालुक्यांमध्ये बरेच सबस्टेशन असून, त्यातील ट्रांसफाॅर्मर नादुरुस्त असल्याने त्याची रिपेअरिंग करून वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
--------------------------------