अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 24, 2023 04:09 PM2023-03-24T16:09:07+5:302023-03-24T16:09:54+5:30
२६२०० शेतकऱ्यांचे पीक बधित
अमरावती : एक आठवड्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा पश्चिम विदर्भातील ९१२ गावांना फटका बसला आहे.. या आपत्तीमुळे २६,२०० शेतकऱ्यांच्या २०,३७६ हेक्टर शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. शुक्रवारपर्यंत १६,७३७ क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रियेत आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १०,२७९ शेतकऱ्यांच्या ६५३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,७१७ हेक्टरमध्येच पंचनामे पूर्ण झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात ४,३१५ शेतकऱ्यांच्या ३,४०८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. सद्यस्थितीत २,६८० हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात ३,७२१ शेतकऱ्यांच्या ३,४७६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. शुक्रवारपर्यंत २,६५४ हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात २,३७१ शेतकऱ्यांच्या २,२५२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यातुलनेत सद्यस्थितीत १,९८६ हेक्टरमधील पंचनामे पूर्ण झाले आहेत. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये ५,५१४ शेतकऱ्यांच्या ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.