चांदूर बाजार रुग्णालयाचे ‘अपग्रेडेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:01:05+5:30
१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावतीकरण करण्याबाबत आ. बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या भगिरथ प्रयत्नांतून या रुग्णालयासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या ६० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम जोमात सुरू आहे. सोबतच दीड कोटी रुपयांच्या निधीतून चांदूर बाजार आगाराचे सुशोभीकरण केले जात आहे.
तालुका मुख्यालय असलेल्या चांदूर बाजार शहराच्या वाढती लोकसंख्येमुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना हव्या तशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. इमारतीची जागाच मोजकी असल्याने अनेक रुग्णांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते. यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर व्हावे, याकरिता आमदार बच्चू कडू यांनी पाठपुरावा केला आणि ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी ११ कोटी १७ लाख रुपयांचा निधी खेचून आणला. आता या निधीतून रुग्णालयाची भव्य इमारत उभारली जात आहे. येथे रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहरातील स्वीपर कॉलनी येथील मंदिराच्या सुशोभीकरणाकरिता आ. बच्चू कडू यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी त्यांच्यासह नगरसेवक नितीन कोरडे, सरदार खान, सचिन खुळे, माजी उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शहर अध्यक्ष आबू वानखडे तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.
एसटी आगाराचे नूतनीकरण
१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत आहे. याशिवाय चांदूर बाजार ते अमरावती मार्गातील जयस्तंभ ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्याकरिता आ. कडू यांनी दीड कोटींचा निधी उपलब्ध केला आहेत. जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे चौपदरीकरण, सौंदर्यीकरण व सुधारणेवर हा निधी खर्च होणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या रस्त्याच्या कामानंतर शहरातील वाहतूक सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.