विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:57+5:302021-05-10T04:12:57+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाची स्थिती फारच भयानक होत चालली आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिवाळी ...
अमरावती : कोरोना संसर्गाची स्थिती फारच भयानक होत चालली आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हिवाळी २०२० परीक्षा न घेता त्यांना वर्गोन्नत करावे, अशी मागणी विद्या परिषदेचे सदस्य तथा प्राचार्य आर.डी. सिकची यांनी केली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना या आशयाचे निवेदन पाठविले आहे.
जिल्हा प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे विद्यापीठाने हिवाळी २०२० ऑनलाईन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ५ मे पासून विधी, अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ झाले होते. आता १२ मे पासून कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या हिवाळी २०२० पदवीच्या सत्र १, ३. ५ आणि पदव्युत्तर सत्र १ व ३ परीक्षा होऊ घातल्या होत्या. कोविड १९ च्या कारणास्तव त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती लक्षा घेता या परीक्षा पुढे घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, कोरोनाचा वाढता उद्रेक बघता ही स्थिती पुढे दोन, तीन महिने आटोक्यात येणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. अगोदर महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले असून, ऑनलाईन परीक्षा डोंगराळ, ग्रामीण भागात घेणे कठीण होत आहे. येथे सोईसुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात असून, कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जानेवारी, फेब्रुवारीत होणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षांचे मे मध्ये नियोजन करण्यात येत आहे. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांसाठी मानसिक दृष्ट्या सक्षम नाहीत. हिवाळी २०२० परीक्षा रद्द कराव्यात आणि अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या २०२१ परीक्षांत्या नियोजनास सुरुवात करावी, असे ८ मे रोजी निवेदनातून आर.डी. सिकची यांनी म्हटले आहे.
--------------------------
कोट
आर.डी. सिकची यांचे पत्र प्राप्त झाले. तथापि, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विविध प्राधिकरणांना घ्यावा लागताे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता याविषयी पुढे निर्णय घेण्यात येईल, विधी, अभियांत्रिकी, फार्मसी शाखांच्या ऑनलाईन परीक्षा आटोपल्या आहेत.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ