सर्व समाजाच्या उत्थानासाठी डॉ. बाबासाहेबांचे कार्य
By Admin | Published: March 6, 2016 12:03 AM2016-03-06T00:03:30+5:302016-03-06T00:03:30+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वच समाजाच्या उत्थानासाठी होते.
प्रवीण पोटे : जिल्हा युवा संमेलनाचे उद्घाटन
अमरावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वच समाजाच्या उत्थानासाठी होते. त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त येथील नेहरू युवा केंद्राच्यावतीने एस.व्ही. देशमुख मेमोरीयल हॉलमध्ये आयोजित जिल्हा युवा संमेलनाचे उद्घाटन ना.पोटे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. खा.आनंदराव अडसूळ, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहणकर, रवींद्र मुंद्रे, गणेश हलकारे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते.
ना.पोटे म्हणाले की, जिल्ह्यात मोठे मनुष्यबळ उपलब्ध आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंती वर्षानिमित्त युवकांनी भारतीय राज्य घटनेवर आधारित विविध चर्चासत्र संमेलने, कार्यशाळा अशा उपक्रमात सहभागी होऊन संमेलनातून प्रेरणा घ्यावी. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आचार, विचाराच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन उपेक्षित लोकांच्या उद्धारासाठी सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी देशात आदर्श निर्माण केला, असे ते म्हणाले. यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोहळा जटेश्वर नेहरू युवा मंडळास २५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव केला. अमरावतीचे भीम बारसे या तरुणाने वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा व राष्ट्रीय पातळीवर अनुक्रमे पाच हजार, २५ हजार व दोन लक्ष रुपये रोख पारितोषिक पटकाविले त्याबद्दल त्यांचा यावेळी शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी गीत्ते म्हणाले, नेहरु युवा केंद्राचे नेटवर्क राज्यभर आहे. येथील स्वयंसेवक जीवनात नेहमी यशस्वी होतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट सांगून त्यांनी शिका, संघटित व्हा हा मंत्र दिला. ग्रामीण भागातील युवकांना अधिकाअधिक संधी विविध क्षेत्रात देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)