अप्पर वर्धा ओव्हरफ्लो तीन दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:52 AM2019-09-10T00:52:44+5:302019-09-10T00:53:12+5:30
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोपाल डाहाके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ९ सप्टेंबर रोजी अप्पर वर्धा धरणाने कमाल पातळी गाठल्याने पाटबंधारे विभागाने धरणाचे तीन दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दारे प्रत्येकी १० सेंटिमिटरने उघडण्यात आली. अप्पर वर्धा प्रकल्पात ९९.३८ टक्के जलसंचय झाल्यानंतर स्थानिकांसह पर्यटकांनाही धरणाची दारी उघडण्याची प्रतीक्षा होती. सोमवारी दारे उघडणार, अशी माहिती समाजमाध्यमांमध्ये 'व्हायरल' होताच अनेकांनी धरणस्थळ गाठून पांढऱ्या शुभ्र धबधब्यासमान पाण्याच्या मनसोक्त आनंद घेतला.
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, चांदूर रेल्वे, तिवसा व आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी सकाळी धरणातील जलसंचय ३४२.५० मीटर झाल्याने कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दारे उघडण्याचे आदेश दिले. अप्पर वर्धा धरणाला १३ वक्र दरवाजे असून पहिले, सातवे व तेरावे दार दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक म्हणजेच येवा १२५ क्युसेक असून तीन दारे प्रत्येकी १० सेमीने उघडल्याने ५० घन मीटर प्रतिसेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी धरणाची दारे उघडण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे, उपविभागीय अभियंता पी.डी. सोळंके, एम. एल. शेंडे, शाखा अभियंता जी. व्ही. साने व पी. व्ही. कडू यांनी धरणातील पाण्याचे पूजन करून तीन दारे उघडली. पाण्याची आवक बघता ही स्थिती सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल उंबरकर, दत्तू फंदे, उमेश शिंदे हे अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धरणाचे उघडलेल्या दारांतून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी व तुषारांनी चिंब होण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
जून-जुलैमध्ये अप्पर वर्धा प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली आली होता. त्यामुळे कधीकाळी पाण्याखाली बुडालेली गावे प्रथमच उघडी पडली होती. मोर्शी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली होती. सिंचनाकरिता पाणी नसल्याने अनेक संत्राबागा सुकल्या होत्या. तालुक्यातील काही गावांत १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही अप्पर वर्धा धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, आॅगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे अप्पर वर्धा धरण क्षेत्रातील वर्धा, जाम, माडू, नळा, दमयंती नदींना महापूर आले. यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात दररोज वाढ होत होती. ४ सप्टेंबर रोजी दमयंती व नळा नदीच्या आलेल्या महापुराने अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली होती.