अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:25 AM2023-06-17T11:25:33+5:302023-06-17T11:27:02+5:30
पोलिस जखमी, दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाखा
मोर्शी (अमरावती) : अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. शुक्रवारी अप्पर वर्धा धरणातूनअमरावतीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडण्यासाठी हल्लाबोल करीत आंदोलक हाती दगड घेऊन गेट तोडण्यासाठी सरसावले. या झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, तर सुमारे ४० जणांना स्थानबद्ध करण्यात आले.
मोर्शी तहसील कार्यालयापासून शेकडो महिला-पुरुष आंदोलनकर्ते अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसले. त्यापूर्वीच आंदोलनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलिस ताफा तैनात करण्यात आला होता. शासन-प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी नारेबाजी सुरू केली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, तहसीलदार सागर ढवळे, ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठविण्यात आले, असे सांगून तहसीलदार सागर ढवळे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना दूरध्वनीवरून कळविले. तथापि, त्यांनी प्रधान सचिवांशी बोलण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा हकीगत कळविण्यात आली, परंतु ही बाब जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील नव्हे, शासन स्तरावरील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, काही आंदोलनकर्त्यांनी हातात दगड घेऊन अप्पर वर्धाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविले व ३० ते ४० आंदोलनकर्त्यांना व्हॅनमध्ये टाकून पोलिस ठाण्यात आणले. आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक व झटापटीत एका पोलिस कर्मचाऱ्याला डोळ्याला मार लागला. दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली. यावेळी मोर्शी, वरूड, शिरखेड पोलिस तसेच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.
आंदोलकांना ताब्यात घेऊन सुटका
आंदोलनात मोर्शी, वरूड तालुक्यातील शेकडो धरणग्रस्त महिला-पुरुष उपस्थित होते. मोर्शी पोलिसांनी कलम ६८, ६९ अंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेऊन सुटका करण्यात आली.
यापूर्वी मायवाडी येथे आंदोलन
प्रकल्पग्रस्तांनी काही दिवसांपूर्वी मायवाडी येथून नांदगावपेठ एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोर्शी पोलिसांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर मोर्शी-अमरावती मार्गातील पंचायत समितीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडले होते.