गाळात रुतले अप्पर वर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:50 PM2019-03-13T22:50:11+5:302019-03-13T22:50:29+5:30
जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत. त्यामुळे या धरणातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणातील अल्प जलसाठ्यामुळे एकीकडे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असताना, तालुक्यातील अनेक गावांवर पाणीसंकट कोसळले आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ६७८.२७ दशलक्ष घनमीटर असून, तूर्तास धरणात २३८.४६ दलघमी पाणी असले तरी त्यापैकी केवळ १२४.२४ ( २२ टक्के) जलसाठा पिण्यासाठी उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने गाळ काढण्याची व खोलीकरणाची मागणी समोर आली आहे. मोर्शी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस कोसळल्याने पाण्याची पातळी खोल गेली. भूजलाचा बेसुमार उपसा झाल्याने भूगर्भाची चाळण झाली. विहिरी, बोअर आटल्या. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या संत्राबागा टँकरच्या पाण्यावर जगवित आहेत. अप्पर वर्धा धरणातून ७० गावांना पाणीपुरवठा केला जातो. अमरावती व मोर्शीकरांची तहानसुद्धा याच धरणाच्या पाण्याने भागविली जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यात अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मोर्शी-अमरावतीकरांवर पाणी कपातीची वेळ येऊन ठेपणार आहे.
धरणाच्या खोलीकरणाची कामे तातडीने व्हावी
अप्पर वर्धा जलाशय हे मोर्शी व अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी उपयुक्त आहे. इतरत्र पाणी टंचाई असताना या धरणाने मात्र कधीही धोका दिला नाही. यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सध्या अप्पर वर्धा धरणात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण -गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत अप्पर वर्धा धरणातील गाळ काढण्यात येऊन पाणी साठवण्याच्या दृष्टीने धरणाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. आनंद घोंगडे, सचिव प्रमोद राऊत व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.