अप्पर वर्धाचे पाणी महादेव प्रकल्पात नेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:06 AM2019-09-17T00:06:48+5:302019-09-17T00:07:09+5:30
जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येणार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. प्रारंभीच्या टप्प्यात अप्पर वर्धा प्रकल्पातील पाणी महादेव प्रकल्पात सोडण्यासाठी प्रकल्प जोड कार्यक्रम नावीन्यपूर्ण योजनेत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल. पंढरी मध्यम प्रकल्पात क्रेस्ट लेव्हलपर्यंत २४ दलघमी पाणीसाठा क्षमता निर्मिती झालेली आहे. उर्वरित पाणीसाठा (६२.२९ दलघमी) मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पाइप डिस्ट्रिब्यूशनचे काम सुरू करण्यात आले आहे. पाक नदी प्रकल्प व चांदस लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ६ हजार ६१ शेतकरी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३५ हजार २२६ अर्जांना पूर्वसंमती दिली आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांना ७६१ कोटी ३० लक्ष रुपये कर्जमाफी मिळाली आहे. जे शेतकरी हिरव्या यादीत आहेत, त्यांनी नावे व कर्ज लक्षात घेऊन शासनाकडून आवश्यक निधी मिळवून घ्यावा, असे आदेश बँकांना दिले आहेत. पुनर्गठणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या समावेशासाठी प्रयत्न होत आहेत. बँकांनाही निर्देश दिले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी सहायक निबंधक पातळीवर समिती केली आहे. पात्र शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
कृषी यांत्रिकीकरणाला बळ
कृषी यांत्रिकीकरण योजनेत वैयक्तिक अनुदान मिळतेच; पण बचतगट वा शेतकरी कंपनीला अवजार, ट्रॅक्टर आदींसाठी बँकेमार्फत ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे. यंदा ४७ हजार ४५० शेतकरी बांधवांना ५३९.५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. वाळलेल्या संत्रा झाडांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ८२ हजार प्रतिहेक्टर मदत दिली जात असल्याचे ते म्हणाले.