ऊर्ध्व वर्धा तळाला; गाव, मंदिराचे अवशेष उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:04 AM2019-06-15T01:04:24+5:302019-06-15T01:05:33+5:30
ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे साठा कमी झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनंतर धरणाच्या निर्मितीमध्ये गेलेली गावे, मंदिर यांचे अवशेष उघडे पडले आहेत. यावरून दुष्काळाची भीषणता दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या ऊर्ध्व वर्धा धरणाचे भूमिपूजन सन १९७६ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. विदर्भ सर्वात मोठे धरण म्हणून ऊर्ध्व वर्धाची ख्याती आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील या धरणाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील २ हजार ९५७ व मध्य प्रदेशातील १ हजार ३४५ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. अमरावती जिल्ह्यातील १३ गावांतील १ हजार २०१ आणि वर्धा जिल्ह्यातील ११ गावांतील १ हजार ४९५ अशी एकूण २ हजार ६९६ घरे पाण्याखाली बुडाली. या धरणामुळे अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ६६२ आणि वर्धा जिल्ह्यातील ६ हजार १५५ नागरिकांना आपले घरे गाव आणि शेतजमिनी सोडाव्या लागल्या. त्यांच्या समर्पणातून अप्पर वर्धा हे भव्य धरण साकारले. अमरावती व वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुके सुजलाम् सुफलाम् झाले. सन १९९४ मध्ये धरणाची दारे बंद करून पाणी साठविणे सुरू झाले. त्यावेळी विस्थापित गावांतील नागरिकांना बुडीत क्षेत्रातून बाहेर काढणे भाग पडले.
करजगाव हे सन १९८० च्या सुमारास मूळ ठिकाणाहून विस्थापित करण्यात आले. या ठिकाणी नळ आणि वर्धा नदीचा संगम झाला. तिथून थोड्याच अंतरावर वर्धा नदी व माळू नदीचासुद्धा संगम झालेला आहे. या गावाचे पुनर्वसन तिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरानजीक करजगाव येथे झाले. या ठिकाणी मंदिरात असलेल्या दोन्ही मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली.
दोन वर्षांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची पातळी वाढली नाही. वाढत्या तापमानामुळे धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे निर्मितीपासून पाण्यात असलेली दोन्ही मंदिरे उघडी पडली आहेत. या ठिकाणी मारुतीरायाचे मंदिर तसेच शंकराचे मंदिरसुद्धा पाण्याबाहेर आले आहे.
दुष्काळाने जागविल्या स्मृती
धरणासाठी संपादित केलेल्या करजगावातील हनुमान मंदिर तसेच शिव मंदिर यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याबाहेर आले आहे. या ठिकाणी सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, घराचे ओटे, परसातील विहिरी, विजेचे तुटलेले खांब, धान्याचे पेव असे अवशेष आढळून आले. मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाचे अवशेषदेखील येथे आहे. दुष्काळाने स्मृती जागविल्याची प्रतिक्रिया पुनर्वसित करजगाव येथील रहिवासी दिगंबर महादेव वानखेडे यांनी दिली.