युरेनसची १३ नोव्हेंबरला प्रतियुती; अवकाशात नेमकं काय घडणारं, मानवी जीवनावर काय परिणाम होणार?
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 4, 2023 05:45 PM2023-11-04T17:45:41+5:302023-11-04T17:52:29+5:30
खगोलीय घटना : ग्रहाला आहेत २७ उपग्रह अन् शनिप्रमाणे रिंग
गजानन मोहोड
अमरावती : सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा ग्रह युरेनस हा १३ नोव्हेंबरला अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ म्हणतात. या काळात पृथ्वीपासून या ग्रहाचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे अशा काळात ग्रहाचे पृथ्वीवरून निरीक्षण चांगल्याप्रकारे करता येत असल्याचे खगोलतज्ज्ञांनी सांगितले.
पंचागकर्ता या ग्रहाचा उल्लेख ‘हर्षल’ असा करतात. युरेनसच्या उपग्रहाची नावे ही शेक्सपिअरच्या नाटकातील पात्रांची आहेत. यामध्ये कार्डेलिया, ऑफिलिया, बियांका, क्रेसिडा, ज्युलिएट व पोर्शिया आहेत. सूर्यापासून युरेनसचे अंतर २८८ कोटी किमी आहे.
हा ग्रह जवळ येत असला तरी मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. हा ग्रह १३ नोव्हेंबरला पूर्व दिशेला उगवेल व पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. याकरिता हायरेंज टेलिस्कोपची आवश्यकता आहे. याआधी बुधवार, ९ नोव्हेंबर २०२२ रोजी या ग्रहाची प्रतियुती झाल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
दुर्बिणीच्या सहाय्याने शोधलेला पहिला ग्रह
युरेनस हा दुर्बिणीच्या सहाय्याने शोधलेला पहिला ग्रह आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास ८४ वर्षे लागतात, तर स्वत:भोवती एक फेरी मारण्यास १७.२४ तास लागतात. विल्यम हर्षल या शास्त्रज्ञांनी १३ मार्च १७८१ रोजी हा ग्रह शोधल्याची माहिती अभ्यासक गिरुळकर यांनी दिली