केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर
By admin | Published: April 15, 2016 12:18 AM2016-04-15T00:18:27+5:302016-04-15T00:18:27+5:30
आंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात.
आरोग्य धोक्यात : अतिवापर धोकादायक, दोषींवर कारवाईची गरज
संदीप मानकर अमरावती
आंब्यासह केळी पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कच्ची केळी मोठ्या प्रमाणात अमरावतीस विक्रीस येतात. याची महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु केळी पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. वृध्दांसह लहान मुले केळी आनंदाने खातात. परंतु यापासून पोटात विष जातो, याची त्यांना काय माहिती? अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार फळे पिकविताना कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणे गुन्हा आहे. परंतु नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या फळविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने रोज नागरिकांना विष पाजले जात आहे. यामुळे घशाचे आजार होतात. तसेच कर्करोग, किडनी व लिव्हर निकामी होतात.
मेंदूचे आजार, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, पोटाचे विकार आदी आजार अशा फळांच्या माध्यमातून होतात. सोमवारी 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी बाहेर तयार केलेल्या इथेलिन गॅसच्या स्प्रेचा वापर फळे पिकविण्यासाठी करण्यात येत आहे. कॅल्शियम कार्बाईडची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन अॅसिटेलीन गॅस तयार होतो. त्यापासून कमी दिवसांत केळी पिकविली जातात. यामुळे आरेसनिक फॉस्फरस हायड्राईड तयार होते. यानंतर नॅचरली इथेलिन गॅस तयार होतो. या गॅसचे ३३ टक्केपेक्षा जास्त प्रमाण असेल तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. हा गॅस आरटिफीशयली बाहेर तयार करून तो फळे पिकविण्यासाठी वापरता जातो. फळे विके्रत्यांकडे ठिकठिकाणी स्प्रेच्या बॉटल आढळतात. ते कॅमेराबंद झाले आहे. परंतु त्या बॉटलमध्ये पाणी असल्याचे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. हा जीवघेणा प्रकार अंबानगरीत होत असताना अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांमध्येही या संदर्भाची जनजागृती होत नाही. त्यामुळे एरवी फळांतून व्हिटॅमीन अ, ब, क स्तर मिळतात. त्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात विविध फळे व केळी नागरिक महागड्या दरात विकत घेतात. परंतु या चविष्ट केळीसोबत आपल्याला विष विकले जात असल्याची त्यांना कल्पनाही नसेल. फळे व केळी पिकविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्बाईड व इथेलिनचा वापर अतिशय घातक असून ते मानवी आरोग्याला अपायकारक असल्याचे मत रसायनशास्त्रज्ज्ञ अमोल डोले यांनी व्यक्त केले.
अन्न विभाग झोपेतच !
लोकांच्या आरोग्याच्या चिंधळ्या उडविले जात आहे. मात्र ज्या अन्न प्रशासन विभागाकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे व त्यांच्यावर यासंदर्भाचे नियंत्रण आहे. तो विभाग गप्प का, असा सवाल अंबानगरीची जनता विचारत आहे. अन्न प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी झोपेतच असल्याची चर्चा आहे. त्यांनी फळे विक्रेत्यांचे परवाने तपासून धाडी टाकून केळी व इतर फळांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे गरजेचे आहे. म्हणजे सर्व सत्य बाहेर निघेल.
कॅल्शियम कार्बाईडचा वापर हा केळी पिकविण्यासाठी करणे अतिशय घातक आहे. तसेच इथेलीन गॅसचा वापर हा ३३ टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर ते आरोग्यासाठी हानीकारक आहे.
- अमोल डोले,
रसायनशास्त्रज्ञ, दर्यापूर
इथेलीन गॅसचा वापर करणाऱ्यावर बंदी नाही. पण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक वापर होतो का, हे तपासावे लागेल. मात्र कार्बाईडचा फळे पिकविण्यासाठी वापर होत असेल तर अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येतील.
- मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग