जलस्तर उंचविण्यासाठी अचलपूर तालुक्यात नदी नांगरण्याचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:47 AM2019-06-13T01:47:33+5:302019-06-13T01:48:02+5:30
जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचे प्रयोग होत आहेत. याद्वारे नदीचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल व जलस्तर उंचावून परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी व्यक्त केला.
अमरावती : जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचे प्रयोग होत आहेत. याद्वारे नदीचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल व जलस्तर उंचावून परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी व्यक्त केला.
जलयुक्तच्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर तालुक्यातील गावांचा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. अचलपूर तालुक्यातील जलालपूर, देवगाव परिसरातील चंद्रभागा नदीत जेसीबी आदी यंत्राद्वारे नदी नांगरण्याचा प्रयोग होत आहे. नदीच्या पात्राची जमीन सखोल नांगरली जात आहे. नदीच्या दोन्ही काठांदरम्यानचा भाग संपूर्ण सखोल नांगरल्यामुळे पुराचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल. त्यामुळे जलस्तर उंचावून पाणीटंचाईपासून दिलासा मिळेल. नदीलगतच्या विविध गावांना, शेतशिवाराला त्याचा फायदा होईल व कृषी उत्पादकताही वाढेल, असे नवाल यांनी सांगितले.
जिल्ह्यात इतरही ठिकाणी जिथे पुराच्या शक्यता आहेत किंवा पाणी वाहून जाण्याचे मोठे प्रमाण आहे, तिथे अशी कामे विनाविलंब चालू करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनेक ठिकाणी गाळ साचून नदीचे पात्र उथळ होते. पुराचे प्रमाण वाढते. अशाठिकाणी ही कामे तत्काळ करावीत. या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले. राजुरा शिवार, नारायणपूर परिसरात जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट नाला बांधाच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली. या बंधाऱ्यामुळे १३९ हेक्टर जमिनीला लाभ होईल.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावकºयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिसरातील काही गावे ‘पोकरा’मध्ये समाविष्ट आहेत. तेथील कामांचीही माहिती त्यांनी घेतली. बोरगावपेठ या गावाला भेट देऊन त्यांनी खरीप कर्ज वितरण, विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली व तेथील गावकºयांशी संवाद साधला.