शासकीय कामात चोरीच्या रेतीचा वापर
By Admin | Published: April 15, 2015 11:57 PM2015-04-15T23:57:30+5:302015-04-15T23:57:30+5:30
शासकीय संपत्तीचे रक्षण करण्यासाठी राज्यातील महसूल पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाचे जांबाज अधिकारी
लाखोंचा महसूल बुडीत : महसूल, पोलीस, आरटीओ वसुलीत व्यस्त
अमरावती : शासकीय संपत्तीचे रक्षण करण्यासाठी राज्यातील महसूल पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाचे जांबाज अधिकारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असल्याची कित्येक उदाहरणे आहेत. याऊलट या शासकीय यंत्रणांनी वाळू माफियांना राष्ट्रीय महामार्ग खुला करुन दिला आहे. केवळ ५ हजार रुपये महिना व २०० रुपये पासींगमध्ये दररोज ५० वर ट्रक ५०० ब्रासवर कन्हान व बालाघाट रेतीची खुलेआम वाहतूक करीत आहेत. बेपर्वा अधिकाऱ्यांमुळे दररोज १० लाखांचा महसूल बुडत आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने कायदा व सुव्यवस्था बासनात गुंडाळून वाळूमाफियांनी राष्ट्रीय महामार्गाचा दुरूपयोग चालविला आहे.
नागपूर विभागातील कन्हान व मध्यप्रदेशातील बालाघाट येथील रेती बांधकामासाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते. ती वाया जात नाही. तसेच जिल्ह्यातील पूर्णा व वर्धा रेतीपेक्षा या वाळूचे दर कमी असल्याने या रेतीला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वाळू माफियांनी ही रेती अवैधरित्या अमरावती जिल्ह्यात आणून विकण्याचा सपाटा लावला आहे. अनेक दिवसांपासून हे सुरू आहे.
मोझरीनजीकच्या ‘त्या’ ढाब्यावर होते वसुली
मोझरी ते तिवसा दरम्यान मोझरीपासून एक किमी अंतरावर ‘अफसर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धाब्यावर अवैध रेतीची वाहने, जनावरांची अवैध वाहतूक करणारी वाहने तसेच अवैध मांस वाहतूक करणारी वाहने, नेहमीच थांबतात. येथील ईसम पोलीस, महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाला त्यांचा हिस्सा पोहोचवितो. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या धाब्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
एमपी व नागपूरच्या वाळूमाफियांचे अमरावतीत संधान
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बालाघाट व नागपूर विभागातील कन्हान येथील रेतीला अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मागणी आहे. हे हेरुन या जिल्ह्यातील वाळूमाफियांनी अमरावतीच्या एजंट व वाळूमाफियांशी संधान साधून पोलीस, महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाचे सेटिंग केले आहे. दररोज ५० वर ट्रक बिनधास्त धावत आहेत.
मालवाहू ट्रकचा वापर, शासनाला चुना
बालाघाट व कन्हान येथील रेतीची वाहतूक करण्यासाठी, मालवाहतूक ट्रकचा वापर करण्यात येतो. ट्रकवर ताडपत्रीचे आच्छादन, लाकडी पाट्या टाकून एका ट्रकमध्ये किमान १० ते १२ ब्रास रेती आणली जाते. ही वाहने अमरावती येथील ‘आदिल’ नामक व्यक्तिची असल्याची माहिती पोलीस, महसूल विभागाच्या सूत्राने दिली.
ज्या तालुक्यात चोरीची किंवा वहन परिमाणापेक्षा जास्त रेती असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर पथके तैनात आहेत. कारवाई त्यांच्याकडून अभिप्रेत आहे.
-विनोद शिरभाते,
जिल्हा खनिकर्म अधिकारी.