बकऱ्या चोरण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:18+5:302021-02-25T04:14:18+5:30
फोटो - २४ एस चांदूर रेल्वे धानोरा (म्हाली) येथील प्रकरण, आरोपी पसार, चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई चांदूर रेल्वे : ...
फोटो - २४ एस चांदूर रेल्वे
धानोरा (म्हाली) येथील प्रकरण, आरोपी पसार, चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई
चांदूर रेल्वे : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा (म्हाली) येथील बकऱ्या चोरी प्रकरणात यवतमाळ येथून क्वालिस चारचाकी वाहन चांदूर रेल्वे पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणातील आरोपी पसार झाला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, अब्दुल परवेज अब्दुल रहीम (२८) हे आई-वडिलांसह धानोरा (म्हाली) येथे राहतात आणि बकऱ्या चारण्याचे काम करतात. त्यांच्याकडे एकूण ३० बकऱ्या आहेत. १९ फेब्रुवारी रोजी बकऱ्या चारून आणल्यानंतर अ. परवेज यांनी सायंकाळी त्यांना घराशेजारील कुडाच्या शेडमध्ये बांधले. रात्री १० वाजता ते निद्राधीन झाले. २० फेब्रुवारीच्या पहाटे २.३० वाजता फिर्यादीच्या आईला बकऱ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्या झोपेतून उठल्या आणि बाहेर आल्या असता, त्यांना एक इसम बकरी हिरव्या रंगाच्या चारचाकी वाहनात टाकताना दिसला. त्यामुळे तिने आरडाओरड केली असता, त्या इसमाने बकरी तिथेच सोडून दिली आणि वाहनात बसला. त्याचवेळी अगोदरच बसलेल्या दुसऱ्या इसमाने वाहन पिटाळले. कुटुंबीय जागे झाल्यानंतर दहा बकऱ्या, पाच पाठ, एक बोकड आणि पाच पिल्ले असे एकूण २१ बकऱ्या गायब असल्याचे निदर्शनास आले. कुुटुंबीयांनी बकरीचोरांचा पाठलाग केला. आजूबाजूला शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठून ४६ हजार ५०० रुपये किमतीच्या बकऱ्या अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सहायक ठाणेदार विक्रांत पाटील हे करीत आहेत.
------------
यवतमाळात जप्ती
चांदूर रेल्वे पोलिसांनी भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यवतमाळ येथील आरटीओ ऑफिसजवळील पोभारू ले-आऊट येथून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन (एमएच २४ सी २६०६) चांदूर रेल्वे पोलिसांनी बुधवारी रात्री जप्त करून ठाण्यात आणले.