कृषी विभागातील रिक्त पदाचा १०० दिवसांत भरणा, ना. अब्दूर सत्तार यांची माहिती
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 28, 2023 04:32 PM2023-04-28T16:32:46+5:302023-04-28T16:33:25+5:30
आदिवासी भागासाठी आठवडाभरात प्रक्रिया
अमरावती : कृषी विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढत आहे. ही रिक्त पदे १०० दिवसात भरल्या जातील. याशिवाय आदिवासी भागातील रिक्त पदांसंदर्भात कृती आराखडा करणे सुरु आहेत. यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
अमरावती विभागात खरीप हंगामासाठी नियोजन बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विमा कंपन्यांनी नाकारलेल्या पूर्वसूचना अर्जासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील पीक विमा कंपनी ही केद्र शासनाचीच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.
पोकरा, योजनेची मुदत आता चार महिन्यांची राहिली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामे संपवा व नविन प्रस्ताव थांबविण्याचे निर्देश आपण दिले आहेत. जागतिक बॅकेच्या अर्थसहाय्याने या योजनेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. याला जागतिक बँकेसह, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंजुरात दिलेली असल्याचे ना. सत्तार म्हणाले. यंदाच्या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचे नियोजन करण्यात आल्याने तुटवडा राहणार नाही. अधिकाऱ्यांना स्टॉक तपासणीचे निर्देश दिल्याचे ना. सत्तार यांनी सांगितले.