निवडणूक मतदान बूथच्या धर्तीवर कोरोनाचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:23+5:302020-12-12T04:30:23+5:30
अमरावती : नवीन वर्षात कोरोना लस येण्याचे संकेत आहे. त्यानुसार शासन, प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन चालविले आहे. मतदानाप्रमाणे बूथ तयार ...
अमरावती : नवीन वर्षात कोरोना लस येण्याचे संकेत आहे. त्यानुसार शासन, प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन चालविले आहे. मतदानाप्रमाणे बूथ तयार करण्यात येणार असून, तेथे काेरोनाची लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तींचा मोबाईलवर संदेश येईल आणि क्यू.आर.कोड असलेले प्रमाणपत्र पाठविले जाणारआहे. त्याकरिता जिल्हास्तरावर ‘टास्क फोर्स’चे गठन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे.
केरोना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणीदेखील करण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्य सेवक, रोजंदारीवरील कामगार, परिचारिका, डॉक्टर आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना अगाेदर लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. यात राज्य व केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना व्याधी आहेत, अशा ५० वर्षांखालील व्यक्तींना लस देण्याचे नियोजन असणार आहे.
-------------------
यादीत नावे तपासल्यानंतरच लसीकरण
निवडणूक मतदानाच्या धर्तीवर लसीकरणासाठी बूथ असणार आहे. लसीकरणाच्या यादीत नावे असलेल्यांना कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासून लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका शहरी आरोग्य केंद्रात ही सुविधा असणार आहे. एका बुथवर १०० व्यक्तींना लस मिळेल, अशी सुविधा असणार आहे.
--------------------
जिल्ह्यात १७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेलीच शीतगृहे कोरोना व्हॅक्सिनसाठी वापरण्यात येईल. लसीकरणाचे प्राधान्यक्रम शासनस्तरावर ठरविले आहे. लसीकरणाचे नियोजनासाठी ‘टास्क फोर्स’ असणार आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती