वाढत्या संसर्गात लसीकरण ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:25+5:302021-05-18T04:13:25+5:30
अमरावती : कोरोनाचा उद्रेक वाढता असताना महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना असणारे लसीकरण मात्र, पुरवठ्याअभावी लॉकडाऊन आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ...
अमरावती : कोरोनाचा उद्रेक वाढता असताना महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना असणारे लसीकरण मात्र, पुरवठ्याअभावी लॉकडाऊन आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील १३० लसीकरण केंद्रांना टाळे लागल्याने ज्येष्ठांची परवड होत आहे. शासनस्तरावर नियोजनाचा अभाव असल्याने कसा रोखणार कोरोना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात चार दिवसांपासून दोन्ही लसींचा पुरवठा नाही. लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढल्याने उपलब्ध स्टॉक केव्हाच संपला. त्यामुळे या केंद्रांना टाळे लावण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावली आहे. नागरिकांना मात्र, याविषयीची माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पहाटे केंद्रांवर आले असताना त्यांना परत जावे लागले. सोमवारी फक्त तिवसा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दोन- तीन केंद्रच सुरू राहतील. उपलब्ध साठा संपल्यानंतर जिल्ह्यातील १३५ लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून हेल्थ लाईन वर्करचे लसीकरण सुरू झाले . त्यानंतर महिनाभरात फ्रंटलाईन वर्कर या टप्प्यात महसूल, पोलीस आदी विभागांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजाराचे नागरिक व आता १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणाचे नियोजन फसल्यामुळे केंद्रावर पहाटे ४ वाजतापासून शेकडो नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बहुतांश केंद्रावर पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३,८४,३८० व रविवारी ४,३११ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्या केंद्रावर काही व्हायल शिल्लक आहे. त्या संपल्यानंतर ती केंद्रेदेखील ऑनलाईनमध्ये निरंक राहणार आहे. साठा उपलब्ध होताच लसीकरण सुरू करण्यात येईल. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारा करण्यात आलेले आहे.
बॉक्स
कोविशिल्डचा आता ८४ दिवसांनी दुसरा डोस
केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानंतर कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील कालावधी आता १२ ते १६ आठवड्यांनी म्हणजेच ८४ दिवसांनंतर करण्यात आलेला आहे. याबाबतचा बदल ‘कोविन’ ॲपच्या डिजिटल प्लॅटफार्मवर करण्यात येत आहे. त्यामुळे आता या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनीच ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
आतापर्यंत ३,८४,३८० नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत ३,८४,३८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ३१,१७८ हेल्थ केअर वर्कर, ३३,७७३ फ्रंटलाईन वर्कर, १८ ते ४४ वयोगटातील १८,३८०, ४५ वर्षांवरील कोमार्बिडीटी आजाराचे नागरिक १,२४,३७८ तसेच ६० वर्षांवरील १,७६,६९३ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अद्याप २,४६,७७८ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
बॉक्स
मागणीच्या तुलनेत लसींचा अत्यल्प पुरवठा
आरोग्य विभागाने मागणी केलेल्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्केच डोसचा पुरवठा आतापर्यंत झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३,९१,०७० डोसचा पुरवठा करण्यात आला. यात ३,१३,०८० डोस कोविशिल्ड व ७७,९९० डोस कोव्हॅक्सिनचे मिळाले आहे. मागणीच्या तुलनेत हा अत्यल्प साठा असल्याने लसीकरण केंद्रांवर रोज शेकडो नागरिकांची गर्दी होत असल्याचे वास्तव आहे.
पाईंटर
आतापर्यंत प्राप्त डोस : ३,९१,०१७
झालेले लसीकरण : ३,८४,३८०
जिल्ह्यातील एकूण केंद्र : १३५
पहिला डोस घेतलेले नागरिक : ३,१५,५७९
दुसरा डोस घेतलेले नागरिक : ६८,८०१
कोट
लसींचा साठा संपल्याने आता जवळजवळ सर्वच केद्र बंद आहे. डोस प्राप्त होताच पुन्हा लसीकरण केंद्र सुरू होतील. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
शहरातील सर्व लसीकरण केंद्र रविवारपासून बंद आहे. लसींचा साठा प्राप्त होताच केंद्र सुरू होतील व याची माहिती माध्यमांद्वारे देण्यात येणार आहे.
- विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका