लसच उपाय, लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:26+5:302021-05-04T04:06:26+5:30
अमरावती : जिल्ह्यात पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्य:स्थितीत तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ...
अमरावती : जिल्ह्यात पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्य:स्थितीत तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. साहजिकच या लसीकरणानंतर जिल्ह्याचा मृत्यूदर कमी झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा मृत्यूदर १.४६ च्या दरम्यान आहे.
जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. काही दिवसांनंतर सर्वच १४ तालुक्यांतील १२० केंद्रांवर लसीकरण होत आहे. लसींच्या पुरवठ्यावर कमी-अधिक प्रमाणात ही केंद्रे सुरू राहतात. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचा पुरवठा होत आहे. यामध्ये कोविशिल्ड लसींचे २,५३,२८० व कोव्हॅक्सिनचे ५९,९२०, असे एकूण ३,१३,२०० डोस प्राप्त झाले आहेत.
यामध्ये हेल्थ केअर वर्कर्सचे २९,७४८, फ्रंटलाइन वर्कर्सचे २९,७३७, १८ ते ४४ वयोगटात १,०७६, ४५ ते ५९ वयोगटात ९८,२२६, व ६० वर्षांवरील १,४४,०२० व्यक्ती, असे एकूण ३,०२,८०५ नागरिकांचे लसीकरण रविवारपर्यंत पूर्ण झाले आहे. ही एकूण उद्दिष्टाच्या ४२ टक्केवारी आहे. मात्र, लसींचा पुरवठा अत्यल्प होत असल्याने सोमवारी बहुतेक केंद्र बंद असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागले.
बॉक्स
पहिल्या डोसनंतर तीन टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्याची लोकसंख्या ही ३० लाखांच्या घरात आहे. त्यातुलनेत सध्या झालेले ३,०२,८०५ नागरिकांचे लसीकरण हे १३ टक्क्यांदरम्यान आहे.
लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजेच पाच ते सहा टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांनादेखील सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या व्यक्तीचे प्रमाण नगण्य म्हणजे ०.५० दरम्यान असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
लस महत्त्वाची, मृत्यूचा धोका कमी
जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची उदाहरणे नगण्य आहेत. कोरोना प्रतिबंधक लस असल्याने नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्ण गंभीर झालेला नसल्याचे दिसून आले आहे व लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास मृत्यूचा धोका नसल्याची माहिती आरोग्य यंत्रणेद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र सर्वांनी लस घेणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्हचे प्रमाण नगण्य
जिल्ह्यात लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण नगण्य आहे. विशेष म्हणजे हेल्थलाइन वर्कर जे सातत्याने कोरोना पॉझिटिव्हच्या संर्पकात राहतात त्यांना काहीअंशी शक्यता जास्त असते, जिल्हा शल्यचिकित्सकांनीदेखील लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
बॉक्स
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरण व दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित आहे व प्रत्येकाने ती घेतली पाहिजे.
डॉ. विशाल काळे
पाॅइंटर
दोन्ही डोस किती जणांनी घेतले : ५३,०२९
एकूण रुग्ण : ६७,५०१
कोरोनाने मृत्यू : १११८
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.