पीएचसीतील लसीकरण पुन्हा होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:03+5:302021-04-13T04:13:03+5:30
अमरावती : कोराेना प्रतिबंधात्मक लसीचा साठा संपल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लसीकरण ...
अमरावती : कोराेना प्रतिबंधात्मक लसीचा साठा संपल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लसीकरण लसअभावी बंद करण्यात आले होते. परंतु सोमवारी जिल्ह्याला २० हजार एवढा लसीचा साठा उपलब्ध झाला. त्यापैकी १४ तालुक्यांना प्रत्येकी १४ हजार याप्रमाणे लस साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील गत दोन तीन दिवसांपासून बंद पडलेले लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.
कोरोनाची लस देण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ५९ केंद्र व उपकेंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यापैकी तब्बल ३५ केंद्रांतील लसीचा साठा १० एप्रिलपासून तुटवड्यामुळे लसीकरण थांबावे लागले. परिणामी ग्रामीण भागात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीविनाच परतावे लागले. अशात १२ एप्रिल रोजी शासनाकडून २० हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मंगळवार, १३ एप्रिलपासून ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील तसेच ग्रामीण रुग्णालयातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम सुरू होणार आहे. लसीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
कोट
लस संपल्यामुळे आरोग्य विभागाने ३५ प्राथमिक आरोग्य केंद्र व काही उपकेंद्रातील लसीकरण बंद केले होते. परंतु सोमवारी लस उपलब्ध झाली. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला १ हजार लसीचा पुरवठा केला आहे. त्यानुसार टीएमओ स्तरावर पीएचसीला लसीचे वितरण केले जाईल व लसीकरणाचे काम पुन्हा सुरू होणार आहे.
- डॉ.दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी