लसीकरणाचे नियोजन, दुसऱ्या डोजला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:46+5:302021-05-13T04:12:46+5:30
अमरावती : ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक ...
अमरावती : ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक लसीकरण स्वतंत्र केंद्रांवर करण्यात येत आहे. मात्र, लस मिळावी म्हणून नोंदणी न झालेल्यांनी उगाच लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.
जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लस ही सर्वांनाच दिल्या जाणार आहे. प्रत्येक केंद्राला दोनशे डोस देण्यात येतात आणि हे डोस नोंदणी झालेल्यांनाच वापरले जातात. याचा सकृतदर्शनी डेटा ठेवला जातो. लसीकरण केंद्रावर टोकन पध्दतीने नंबर लावल्या जाते. टोकन सुरळीत वितरित होण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.
बॉक्स
उपचार सुविधांत वाढ करण्याचे निर्देश
ग्रामीणमध्ये संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुका व ग्रामीण परिसरातील रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व कोविड केअर सेंटरची क्षमता तपासून आवश्यक तिथे खाटा वाढवाव्यात. खासगी रुग्णालयांनीही याप्रकारे उपचार व्यवस्थेत वाढ करावी, असे ते म्हणाले.