गर्भवतींचे लसीकरण ‘लॉक’, लवकरच होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:06+5:302021-07-20T04:11:06+5:30
अमरावती : गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित असल्याबाबतचा निर्वाळा आरोग्य विभागाने यापूर्वीच दिला आहे. मात्र, जिल्ह्यात पुरेशा ...
अमरावती : गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित असल्याबाबतचा निर्वाळा आरोग्य विभागाने यापूर्वीच दिला आहे. मात्र, जिल्ह्यात पुरेशा तयारीअभावी अद्यापही गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, लवकरच सुरू होणार असल्याची माहिती लसीकरण जिल्हा समन्वयकांनी दिली.
लसीकरणासाठी काही आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. ठोसर यांनी प्रशिक्षण दिले. मात्र, अनेकांचे हे प्रशिक्षण राहिले आहे. त्यानंतर जिल्ह्यात गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झालेली आहे. यामध्ये पाच टप्प्यात लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्यक्षात लसींचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने दर आठवड्यात दोन ते तीन दिवस लसीकरण बंद राहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७,४३,७२७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ५,५२,५२५ नागरिकांनी पहिला, तर १,९१,२०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीचा नियमित पुरेसा नाही व कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये वाढविण्यात आलेले अंतर यामुळे जिल्ह्यात ३,३४,३२३ नागरिकांचा अद्याप दुसरा डोस घ्यायचा आहे.
कोट
दोन जिवांची भीती
कोरोना प्रतिबंधक लस गर्भवतींना सुरक्षित आहे. याची माहिती तपासणीच्या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली. लसीकरणासंदर्भात चौकशी केली असता, अद्याप अशा महिलांकरिता लसीकरण सुरू व्हायचे असल्याचे सांगण्यात आले.
- अनिता (गर्भवती स्त्री)
कोरोनाकाळात प्रतिबंधात्मक लस घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, बाळाला काही होऊ नये, यासाठी लस घेण्याची हिंमत होत नाही. बाळाचा जन्म झाल्यानंतर लसीकरण करून घेऊ.
- कल्याणी (गर्भवती स्त्री)
कोट
कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे. लवकरच लसीकरण सुरूही करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या गाईड लाईन आहेत. आवश्यक वाटल्यास किंवा अन्य काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी
पाईंटर
जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरण :
वर्गवारी पहिला डोस दुसरा डोस
हेल्थ केअर वर्कर २०,९०१ १४,६७९
फ्रंट लाईन वर्कर ४१,९३१ १४,७१०
१८ ते ४४ वयोगट १,२५,१८० १२,४३६
४५ ते ५९ वयोगट १,८७,२३४ ६५,५२५
६० वर्षावरील ज्येष्ठ १,७७,२७९ ८३,८५२
एकूण ५,५२,५२५ १,९१,२०२