दिवसभर थांबूनही मिळू शकली नाही लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:20+5:302021-09-27T04:13:20+5:30
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन कोलमडले, नागरिकांची गर्दी, कोरोना नियमावलीची ऐसीतैसी परतवाडा : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात २४ सप्टेंबरला कोरोना ...
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन कोलमडले, नागरिकांची गर्दी, कोरोना नियमावलीची ऐसीतैसी
परतवाडा : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात २४ सप्टेंबरला कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडल्यामुळे दिवसभर थांबूनही नागरिकांना कोरोना लस मिळू शकली नाही. यात लस घेण्याकरिता आलेल्यांची एकच गर्दी उसळली. ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग, ना कोरोनाची भीती. कोरोना नियमावली पायदळी उडविली गेली. कोरोना नियमावलीवर लक्ष देणारी कुठलीही यंत्रणा या ठिकाणी त्यादरम्यान हजर नव्हती.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसीकरणाचे २४ सप्टेंबरला उपजिल्हा रुग्णालयात नियोजन केले गेले. याकरिता नागरिकांना फॉर्मही दिले गेले. लोकांनीही उपजिल्हा रुग्णालयात हजेरी लावली. यातील अनेक लोक सकाळी ८ वाजतापासून रुग्णालयात पोहोचले. ते सायंकाळी ५ पर्यंत लस मिळेल, या आशेवर थांबले. यात कोव्हॅक्सिन लस मिळाली, पण कोविशिल्ड लस मिळू शकली नाही. लस न मिळाल्यामुळे आणि लसीच्या प्रतीक्षेत थांबून थकल्यामुळे काहीकाळ उपजिल्हा रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा नाहक त्रास नागरिकांना झाला. ज्यांना २४ सप्टेंबरला लस मिळू शकली नाही, त्यांना आता २७ सप्टेंबरला बोलवण्यात आले आहे.
------------
सकाळपासून लस घेण्याकरिता आल्यानंतरही ५ वाजेपर्यंत लस मिळू शकली नाही. उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्था बरोबर नाही. याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
- कविता नवलकर, अचलपूर
---------
कोविशिल्ड लस घेण्याकरिता सकाळी १० पासून उपजिल्हा रुग्णालयात हजर झालो. पण, यश आले नाही. आता म्हणतात, सोमवारी या.
- अनिल बर्वे, अचलपूर
----------
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी देण्याचे नियोजन २४ सप्टेंबरला केले गेले. यादरम्यान संगणक प्रणालीत तांत्रिक अडचण आली. एका लसीवरून दुसऱ्या लसीकडे संगणक शिफ्ट होत नव्हते. त्यामुळे कोविशिल्ड लस घेण्याकरिता आलेल्यांना ती देता आली नाही. यात ही गर्दी वाढली.
- डॉ सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर