लसींचा ठणठणाट, केंद्रे ओस पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:10+5:302021-05-04T04:06:10+5:30
१८ ते ४४ वयोगटासाठी केवळ पाच लसीकरण केंद्रे सुरू, जिल्ह्यात गुरुवारनंतर लस येण्याचे संकेत अमरावती : कोरोना संसर्गाचा विळखा ...
१८ ते ४४ वयोगटासाठी केवळ पाच लसीकरण केंद्रे सुरू, जिल्ह्यात गुरुवारनंतर लस येण्याचे संकेत
अमरावती : कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी सरकारने कोवॅक्सिन, कोविशिल्ड अशा दोन प्रकारच्या लसी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यातील केंद्रावर लस उपलब्ध नाही. सोमवारी बहुतांश केंद्रे ओस पडली असून, लसीसाठी रांगा असलेल्या केंद्रावर शुकशुकाटाचे चित्र होते.
शुक्रवार, ३० एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी १३ हजार कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने शासकीय, खासगी रुग्णालयात निकषानुसार वितरित केल्या. मात्र, हा लसींचा साठा केवळ शुक्रवार व शनिवार असे दोनच दिवस पुरेल एवढा होता. जिल्हा लस भांडार केंद्रातही सोमवारी लसींचा ठणठणाट होता. जिल्ह्यातील १४ तालुके, अमरावती महापालिका क्षेत्र, पीडीएमसी असे एकूण १२४ लसी केंद्रांवर हीच स्थिती होती. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या तरुणांना आरोग्य यंत्रणेने निश्चित केलेल्या पाच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्याकरिता ७५०० लसी मिळाल्या असून, जिल्हा रुग्णालयाचा ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका शहरी आरोग्य केंद्र, धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरूड ग्रामीण रुग्णालयात तरुणाचे लसीकरण सुरू आहे. मात्र, हा लसींचा साठादेखील एक, दोन दिवस पुरेल एवढाच आहे. पुन्हा तरुणांना लसीची प्रतीक्षा करावी लागेल, असे चित्र निर्माण होत आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड, काेव्हॅक्सिन अशा दोनही लसी नसल्याने अनेक केंद्रावरून नागरिकांना परत जावे लागले. सोमवारी लस उपलब्ध होईल, असे मानले जात होते. मात्र, आता गुरुवारनंतरच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लस उपलब्ध होईल, अशी माहिती आहे.
-------------------
११ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्र बंद होणार
केंद्र सरकारने लस वितरणबाबत नवीन धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे आतापर्यंत ११ खासगी रुग्णालयांत लसीकरण करण्यात येत होते. मात्र, आता खासगी रुग्णालयातील लसीकरणास ब्रेक लागणार आहे. रुग्णालयांना यापुढे थेट कंपनीकडून लस खरेदी करून लसीकरण करावे लागणार आहे. त्याकरिता शुल्कदेखील आकारले जाणार आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांतली लसीकरण केंद्र बंद करण्यात येणार आहे.
-------------------------
कोट
राज्य शासनाकडे चार लाख लसींची मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारचे लसींसंदर्भात धोरण निश्चित व्हायचे असल्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना कधी लस उपलब्ध होईल, हे सागंता येणार नाही. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी पाच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी