पाळा शिवारात वाघाचा संचार
By admin | Published: April 12, 2015 12:29 AM2015-04-12T00:29:41+5:302015-04-12T00:29:41+5:30
पाळा शिवारात वाघ असल्याची चर्चा जोरात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांमध्ये भीती : वनविभागाने दिली सावधगिरीची सूचना
मोर्शी : पाळा शिवारात वाघ असल्याची चर्चा जोरात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने सावधगिरीची सूचना नागरिकांना दिली असून वनकर्मचारी परिसरावर लक्ष ठेवून आहेत. मागील ७-८ वर्षांपूर्वी पट्टेदार वाघाची विष टाकून हत्या करण्यात आली. या परिसरात वाघ असण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी सालबर्डी, पाळा ही गावे आहेत. परिसरातील पाळीव जनावरे मप्र-महाराष्ट्राच्या सीमेवर चराईकरिता येतात. २५ मार्च रोजी पाळा येथील गुराख्याने जनावरे चराईकरिता नेली होती. त्यात मारोतराव निस्वादे यांची जनावरे होती. दरम्यान निस्वादे यांच्या गोऱ्ह्यावर वन्यपशुने हल्ला केला. वन्यपशुने पकडलेली गोऱ्ह्याची मान सोडली. गोऱ्हा घरी परत आल्यावर नंतर तो मरण पावला. हा हल्ला वाघाने केल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी अशोक कविटकर यांना देताच त्यांनी वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविून शोध घेण्याचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)
जुन्या पार्श्वभूमीमुळेही दहशत
७-८ वर्षापूर्वी पाळा, सालबर्डी परिसरात गोठयात बांधलेल्या जनावरांसह जंगलात चरण्याकरिता गेलेली पाळीव जनावरे वाघाने फस्त केल्याची नागरिकांची ओरड होती. पुढे या पट्टेदार वाघाची विष टाकून भिवकुंडी परिसरात हत्या करण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्याच्या घटनेकडे या अनुषंगाने पाहिले जात असून पाळा-सालबर्डी परिसरात वाघ असल्याची लोकांची शंका आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.