वलगाव मार्ग अतिक्रमणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:54 PM2018-11-14T22:54:55+5:302018-11-14T22:55:30+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे बुधवारी वलगाव मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपा आयुक्त संजय निपाणे यांचे आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे बुधवारी वलगाव मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपा आयुक्त संजय निपाणे यांचे आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
नवसारी, वलगाव रोड येथील धर्मकाट्यापासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. या मार्गाच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमध्ये कुंपणभिंत, अनधिकृत रेचे, टिनाचे बांधकाम, फर्निचर दुकाने, पानठेले, अनधिकृत दुकाने, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यात आले. यावेळी अतिक्रमिकांचा विरोध पोलीस बंदोबस्तात मोडून काढण्यात आला.
अतिक्रमणविरोधी मोहिमेनंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे व उपआयुक्त नरेंद्र वानखडे यांनी पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त योगेश पिठे, तौसिफ काझी, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, उपअभियंता प्रमोद इंगोले, पोलीस निरीक्षक मानकर, अभियंता प्रदीप वानखडे, आनंद जोशी, मनोज शहाळे, जयंत काळमेघ, सचिन मांडवे, नाझीम, प्रवीण भेंडे, चैतन्य काळे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक तसेच झोन मधील अभियंता, अतिक्रमण निरीक्षक प्रवीण इंगोले, उमेश सवई, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रस्त्यांचे अतिक्रमण मंगळवारी काढण्यात आले. यावेळी पाच ट्रक साहित्य महापालिकेने ताब्यात घेतले. पाठोपाठ शहरातील अत्यंत गजबजलेला वलगाव मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला. महापालिकेच्या सातत्यपूर्ण कारवाईचा सुखद अनुभव गेल्या काही दिवसांत अमरावतीकर घेत आहेत.
सदर कार्यवाही निरंतर सुरु ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण काढून वाहने तसेच पादचारी मार्ग मोकळे करण्याचे निर्देशही महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आले आहे.
नागपुरी गेट, वलगाव रोडसारख्या संवेदनशील भागात बुधवारी कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त मागविला होता. ७० ते ८० अतिक्रमणे हटविण्यात आली. ४० जणांनी स्वत:हून अतिक्रमण काढले, तर २५ ते ३० अतिक्रमणांवर पथकाने कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई निरंतर सुरू राहणार आहे.
- गणेश कुत्तरमारे, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग