मेळघाटात वणवा : शेकडो हेक्टर जंगल खाक, वन्यप्राणी गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:29 AM2018-04-25T01:29:43+5:302018-04-25T01:29:43+5:30
पूर्व मेळघाट वन विभागाच्या टेम्ब्रुसोंडा व चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत वैराट परिसरातील जंगलात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता लागली. यात जंगलाची राखरांगोळी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.
चिखलदरा : पूर्व मेळघाट वन विभागाच्या टेम्ब्रुसोंडा व चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत वैराट परिसरातील जंगलात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता लागली. यात जंगलाची राखरांगोळी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. वृत्त लिहिस्तोवर वनविभागाचे कर्मचारी रंगारी आणि मजूर ब्लोअर मशिनच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवित आहेत.
मेळघाटात उन्हाळ्यामध्ये वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात आगी लावण्यात येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले. वैराट परिसरात लागलेली आग लावण्यात आल्याचा कयास वर्तविण्यात आला असून, जंगलातील मोहफुले यासह गुरांना आवश्यक असलेला चारा मोठ्या प्रमाणात यावा आणि तेंदूपत्त्याला चांगली पालवी फुटावी यासाठी आग लावण्यात येत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी जंगलात उंच कड्यावर बांधलेल्या लाकडी मचाणातून लक्ष ठेवून असतानासुद्धा या आगी लागत असल्याचे सत्य आहे. परिसरातील नागरिकांकडूनच हे कृत्य केल्या जात असल्याचा आरोप आहे.
वनविभागाचे युद्धस्तरावर प्रयत्न
उन्हाळ्यात जंगलांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. जंगलातील नदी नाल्यासह पाणवठे कोरडे पडल्याने जंगलातील हिंस्त्र प्राण्यांनी गावाकडे धूम ठोकली आहे. यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा भाजल्याने मृत्यू होतो. मंगळवारी वनपरिक्षेत्र अधिकारी मुनेश्वर, वनपाल अभय चंदेले, काठोई, शिंदेसह २० वनमजूर, अंगारी आग विझविण्याचे कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.