आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत ‘वंचित’ नाही ! जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी धुडकावले पक्ष आदेश
By उज्वल भालेकर | Published: April 21, 2024 01:48 PM2024-04-21T13:48:44+5:302024-04-21T13:52:06+5:30
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
अमरावती: रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उभे आहेत. अशातच रविवारी वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नाही. त्यामुळे लोकशाही बळकटीसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच वंचितचे सर्वच तालुकाध्यक्षही त्यांच्या सोबत असल्याचेही शैलेश गवई म्हणाले.
अमरावतीमधून लोकसभा निवडणूक रिंगणात असलेले आनंदराज आंबेडकर यांनी ३ एप्रिल रोजी वंचित पाठिंबा देत नसल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ४ एप्रिलला त्यांना वंचितने पाठिंबा दिल्यानंतर ७ एप्रिलला आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई देखील पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होते. परंतु दहा ते बारा दिवसातच जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्ष आदेश धुडकावत आनंदराज आंबेडकर यांना महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात असलेल्या कॉँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शैलेश गवई यांच्या म्हणण्यानुसार रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मानसन्मान देत नाहीत. आणि हा सर्व प्रकार आनंदराज आंबेडकर यांना अंधारात ठेवून सुरु आहे. त्यामुळे मताचे विभाजन होऊन संविधान विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये, यासाठी ते कॉँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयासोबत वंचितचे इतरही पदाधिकारी असल्याने आनंदराज आंबेडकर सोबत ‘वंचित’ नसल्याचेह ते यावेळी म्हणाले.
आंबेडकरी समाज आंबेडकर घराण्यासोबत
वंचितचे जिल्हाध्यक्ष यांची प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून ते तसेही प्रचारामध्ये सहभागी झालेले नाहीत. सायन्सौकर मैदान येथे झालेल्या सभेमध्येही ते कुठेच नव्हते. आणि हे आम्हाला यापूर्वीच माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. आंबेडकरी समाज हा आंबेडकर घराण्यासोबत प्रामाणिक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.