हवालदाराला मारहाण करून वाहनाची तोडफोड; आरोपीला दोन वर्षांची सक्तमजुरी
By प्रदीप भाकरे | Published: December 19, 2022 05:30 PM2022-12-19T17:30:33+5:302022-12-19T17:33:53+5:30
जुलै २०२० मधील घटना
अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदाराला मारहाण करून वाहनाची तोडफोड करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी १९ डिसेंबर रोजी हा निर्णय दिला. शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन (३०, रा. अलीम नगर, अमरावती) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
१७ जुलै २०२० रोजी दुपारी १२.३०च्या दरम्यान कोतवाली ठाण्याचे पोलिस कर्मचारी अशोक बुंदेले (५५, रा. श्रीराम नगर, राठीनगर) हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीवर कर्तव्यावर होते. दरम्यान एक इसम इर्विन हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलीसांना मारहाण करीत आहे, अशी माहिती बुंदेले यांना मिळाली. त्यानुसार ते पोलिस हवालदार रुपेश खुरकटे यांच्यासोबत मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेले असता, शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन नामक व्यक्ती हा पोलिस हवालदार सागर चव्हाण यांना मारहाण करीत असल्याचे दिसले.
त्यांनी तत्काळ आरोपी शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिनला ताब्यात घेतले. त्यावेळी शेख इजाजोद्दिन हा सराईत गुन्हेगार असल्याचे हवालदार बुंदेले यांच्या लक्षात आले. त्यावेळी आरोपीने हवालदार बुंदेले यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यावेळी आरोपी बुंदेले यांच्या हातातुन सुटला, त्याने तेथे पडलेला दगड बुंदेले यांना मारला. त्यामुळे ते जखमी झाले. आरोपीने पोलिसांच्या वाहनाच्या दगड मारून नुकसान केले व उपस्थित सर्वांना मारण्याची धमकी दिली.
कोतवालीत तक्रार, न्यायालयात आरोपपत्र
पोलिस हवालदार बुंदेले यांनी त्याबाबत कोतवाली ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी सात साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) रविंद्र ताम्हाणेकर यांनी आरोपीला दोषी ठरवित दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास ठोठावला. हवालदार बाबाराव मेश्राम यांनी पैरवी केली. तर, नापोकॉं अरूण हटवार यांनी सहकार्य केले.