राज्याच्या वनविभागात आता हॅलो ऐवजी वंदेमातरम्! हॅलो फॉरेस्टवरच्या नावाचे काय?
By गणेश वासनिक | Published: August 25, 2022 06:36 PM2022-08-25T18:36:02+5:302022-08-25T18:42:28+5:30
वनविभागाच्या कार्यालयातील भ्रमणध्वनी किंवा टेलिफोनवर आता नमस्कार ऐवजी वंदेमातरम् हे सूर ऐकण्यास मिळणार आहे.
अमरावती : राज्याचे वने तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी शासनाच्या सर्व विभागांना भ्रमणध्वनीवर बोलताना हॅलो ऐवजी वंदेमातरम् शब्दांचा वापर करणे बंधनकारक करतांनाच राज्यात सर्वात प्रथम वंदेमातरम् हे वनविभागाच्या कार्यालयात ऐकण्यास मिळत आहे. तसा आदेश वनविभागाने गुरूवारी जारी केला आहे. त्यामुळे वन विभाग वंदेमातरम् म्हणणारा प्रथम ठरणार आहे.
शासकीय विभागाच्या लँडलाईन किंवा भ्रमणध्वनीवर हॅलो ऐवजी वंदेमातरम् म्हणणे सक्तीचे केल्यामुळे ना. सुधीर मुंगटीवार यांचेवर विरोधक तुटून पडले. राज्यातील ३९ विभाग आणि महामंडळांनी वंदेमातरम् म्हणणे सुरु करण्याबाबत अद्याप पुढाकार घेतलेला नसला तरी ना. मुंगटीवर यांच्याकडे असलेल्या वनविभागाने यात बाजी मारली आहे.
वनमंत्र्यांचा वृक्षलागवडीचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; जमिनीचा डेटा मागविला
महसूल व वनविभागाचे उपसचिव भानुदास पिंगळे यांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी शासन परिपत्रक क्रमांक /प्र.क्र.९८/ फ ५ जारी केलेले आहे. या परिपत्रकानुसार वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय कामानिमित्त जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीद्वारे संभाषण दरम्यान अभिवादन करतांना हॅलो ऐवजी वंदेमातर् म या शब्दाचा वापर करण्याची सक्ती केलेली आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयातील भ्रमणध्वनी किंवा टेलिफोनवर आता नमस्कारऐवजी वंदेमातरम् हे सूर ऐकण्यास मिळणार आहे.
जय हिंद की वंदेमातरम्?
वनविभागात वनरक्षक ते प्रधानमुख्यवनसंरक्षक अशी कर्मचाऱ्यांची रचना आहे, हा विभाग काही स्तरांपर्यंत शासकीय गणवेषधारी असून सैन्य व पोलीस दलाप्रमाणे काम करतो. वनविभागात वनकर्मचारी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवर बोलताना हॅलो म्हणतं नसतात तर ते जयहिंद करतात. मग आता हे कर्मचारी जय हिंद करतील किंवा वंदेमातरम् करतील हे भविष्यात सांगता येईल, शासनाच्या या निर्णयामुळे वनकर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झालेला असून जयहिंद या शब्दाला सोडणे या सेवेतील कर्मचाऱ्यांना अश्यक आहे.
हॅलो फॉरेस्टवरच्या नावाचे काय ?
हॅलो फॉरेस्ट ही संकल्पना सुधीर मुंगटीवार यांनी आणलेली आहे. वनविभागातील शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण, वन्यजीव माहिती, व्याघ्र प्रकल्पांची माहिती त्वरीत मिळावी. याकरिता नागरिकांसाठी हॅलो फॉरेस्ट या नावाची दूरध्वनी सेवा वनविभागात २४ तास कार्यरत आहे, मुळात या सेवेत हॅलो हा शब्द प्रचलित असल्याने या वेबसाईटचे नामकरण वंदेमातरम् फॉरेस्ट होईल का? हे पाहणे यानिमित्याने औत्सुक्याचे ठरेल.