वनविभागात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता!
By admin | Published: June 17, 2016 12:23 AM2016-06-17T00:23:48+5:302016-06-17T00:23:48+5:30
मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्तांतर्गत २७ मे रोजी झालेल्या वनरक्षक, वनपालांच्या बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
लॉबीचा आरोप : तीन टर्म सेवा दिलेल्यांना पुन्हा मेळघाटात बदली
अमरावती : मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्तांतर्गत २७ मे रोजी झालेल्या वनरक्षक, वनपालांच्या बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. दोन ते तीन टर्म मेळघाटात सेवा दिल्यानंतर पुन्हा मेळघाटात बदली करण्यात आल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
वरुड वनपरिक्षेत्रअंतर्गत राजुरा बाजार वनबीटमध्ये कार्यरत वनरक्षक अे.जी. चक्रवर्ती यांनी मुख्य वनसंरक्षकांनी बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याबाबतची तक्रार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. वडाळी, मोर्शी, परतवाडा या वनक्षेत्रात ८ ते १० वर्षांपासून एकाच जागी ठिय्या मांडून बसलेल्या वनरक्षक, वनपालांची बदली का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी वनमंत्र्यांकडे केला आहे. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक तिवारी यांच्या आदेशाअन्वये प्रशासकीय कारणास्तव वरुड वनपरिक्षेत्रात बदली करण्यात आली होती.
येथे दोन वर्षे सेवा पूर्ण न होता २७ मे २०१६ रोजी धारगड वनपरिक्षेत्रात पुन्हा बदली करण्यात आली आहे.
यापूर्वी धारगड वनपरिक्षेत्रात कर्तव्य बजावले असताना पुन्हा त्याच ठिकाणी बदली करण्याचे कारण काय? ही बाबदेखील चक्रवती यांनी उपस्थित केली आहे. बदली करताना विशेष ‘लॉबी’चा वापर केला जात असून मलई लाटण्याच्या जागांवर मर्जीतील वनरक्षक, वनपाल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वरुड येथे मुलींचे शिक्षण सुरू असल्याची विनंती करूनही मुख्य वनसंरक्षकांनी मेळघाटात बदली केली आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी घरी कोणीही नसताना बदली करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. २७ मे रोजी झालेल्या बदली विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
कलम ११५(३) एम.आर.टी.यू अॅन्ड पी.यू.एल.पी. अंतर्गत न्यायालयीन तक्रार क्र. ६५/२०१६ अन्वये मुख्य वनसंरक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मेळघाटात दोन ते तीन वेळा सेवा देऊन परतलेल्या वनरक्षक, वनपालांच्या बदलीचा प्रस्ताव कशाच्या आधारे वरिष्ठांपुढे सादर करण्यात आला, यामागे मोठे षड्यंत्र असल्याची चर्चा वनविभागात जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)