तूर खरेदीसाठी विविध पक्ष आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:44 PM2018-05-19T22:44:27+5:302018-05-19T22:45:08+5:30
शासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी अचलपुरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निवेदन देण्यासोबत साखळी व बेमुदत उपोषण सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी अचलपुरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निवेदन देण्यासोबत साखळी व बेमुदत उपोषण सुरू केले. खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून, तत्काळ खरेदी सुरू करण्यासोबत चुकारे देण्याची मागणी करण्यात आली. विविध पक्षांचे उपोषण, निवेदनांनी तहसील कार्यालय गाजले होते.
शासनाने सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी अचानक बंद केली. त्याचा फायदा घेत व्यापारी वर्गही शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट करत आहेत. विशेष म्हणजे, शासनाने खरेदी केलेल्या सोयाबीन, तूर, चणा यांचे चुकारे अद्यापही शेतकºयांना देण्यात आलेले नाहीत. आता पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असून, शेतकºयांनी जगावे कसे व शेती कशी करावी, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. शेतकºयांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे शासनाने आता त्यांचा अंत पाहू नये तसेच शेतकरी महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसण्याचाही प्रयत्न करू नये, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना दिले.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, कल्पना वानखडे, ममता हुतके, प्रमिला बिजागरे, नीलिमा हागे, माधुरी शिंगणे, संध्या इंगळेसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे साखळी उपोषण
शासकीय तूर व हरभरा खरेदी सुरू करण्यासोबत बारदाना व गोदाम उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे विजय चरपे, अमोल गोहाड, अभिष वानखडे साखळी उपोषणाला बसले आहेत.
चार दिवसांपासून उपोषण
अचलपूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडून तूर व हरभराची खरेदी करण्यात आली, त्या शेतकºयांची यादी देण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे अध्यक्ष राहुल कडू यांनी चार दिवसांपासून अचलपूर तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
मनसेचे निवेदन
शासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी पूर्ववत सुरू करा आणि बोंडअळीच्या नुकसानभरपाईची अंमलबजावणी करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांनी अचलपूर येथे उपविभागीय अधिकाºयांना शनिवारी केली. मनसे तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.