आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:44 PM2018-06-29T22:44:20+5:302018-06-29T22:45:03+5:30
मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी कुरण योजना, तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी व मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजनेंतर्गत विकासात्मक कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चिखलदरा येथील आढावा बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी कुरण योजना, तलावात मत्स्यबीज सोडून मासेमारी व मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजनेंतर्गत विकासात्मक कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चिखलदरा येथील आढावा बैठकीत दिले.
आढावा बैठकीला उपस्थित विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री, उपवनसंरक्षक अविनाश कुमार, गुगामलचे शिवकुमार साहा, वनसंरक्षक सानप, बाल विकास अधिकारी दुर्गे, तालुका कृषी अधिकारी शिवा जाधव, खोज संस्थेच्या पौर्णिमा उपाध्याय, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तथा कर्मचारी उपस्थित होते.
दहा गावांमध्ये नवीन प्रजातीचे कुरण लावून ३१ जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले. मेळघाटात वारी या पिकाचा पेरा वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असेदेखील सांगितले गेले. शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रोत्साहित केल्यास चाराटंचाई निर्माण होणार नाही, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दूध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तसेच विविध दुग्धपदार्थ तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग राबविण्यात आदिवासींना सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तालुक्यातील चिखली, भिरोजा जैथादेही, शहापूर, डोमा, सरिता, खडीमल आदी १० गावतलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन योजनेंंतर्गत १० ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा विकास या योजनेतून केला जाणार आहे. त्याबाबत संपूर्ण ग्रामपंचायतींचा आढावा जिल्हाधिकाºयांनी याप्रसंगी घेतला.