गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:02 PM2024-09-05T16:02:07+5:302024-09-05T16:03:16+5:30
आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अॅड. प्रदीपराव देशमुख मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात.
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वरुड (बगाजी) येथील अॅड. प्रदिप देशमुख यांच्याकडील महालक्ष्मी उत्सवास ११७ वर्षे पूर्ण होत आहेत. या उत्सवाचे महत्व अमरावती जिल्हयातील वरुड (बगाजी) व परिसरातील व्यक्तीना अनन्यसाधारण आहे. वरुड (बगाजी) येथील प्रगतशील शेतकरी कर्मयोगी स्व. श्री बापूरावजी ऊर्फ काकासाहेब देशमुख यांनी या महालक्ष्मी उत्सवाचे महत्व समजून १०० वर्षापूर्वी ज्या गोरगरीब मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी शेतमजुरांना पूर्णवेळ जेवण मिळत नव्हते अशा गावकऱ्यांना महाप्रसादाच्या रूपाने ते आपल्या वाड्यामध्ये मिष्ठान्न भोजनासाठी निमंत्रित करीत असे, गावकरी मोठ्या श्रध्येने त्यांच्या या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असत.
आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अॅड. प्रदीपराव देशमुख हायकोर्ट नागपूर मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात. या दिवशी या गावामध्ये अनेक घरी महालक्ष्मी असल्याने कोणाच्याही घरी वेगळी चूल पेटविली जात नाही. या दिवशी गावकऱ्यांना व प्रत्येक पाहुण्यास देशमुखांकडे महालक्ष्मीच्या दर्शनाचे व महाप्रसादाचे निमंत्रण असते सर्व गावकऱ्यांना जेवणासोबत मिष्ठान्न व आंबील चा प्रसाद वाढला जातो. ही प्रथा गेल्या ११७ वर्षांपासून चालत आलेली आहे. यावर्षी हा उत्सव दिनांक १०,११,१२ सप्टेंबर २०२४ रोजी अनुराधा नक्षत्रावर आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या दिवसापासून ते ५ दिवस मानकरी घरांना जेवणाचे निमंत्रण असते, तर पहिल्या दिवशी आरती करून श्री महालक्ष्मीचे आगमन होते.
दुसऱ्या दिवशी १६ भाज्या, मिष्ठान्न व आंबीलचा नैवेद्य दिला जातो, तर आघाडा, केना, दुर्वा आणि सुवासीक फुले वाहिली जातात. तिसऱ्या दिवशी स्वासीन महिलांद्वारे त्याची ओटी भरून मनभावे पूजा करून त्यांची रवानगी करण्याची प्रथा आहे. चवथ्या दिवशी आंबील व फळांचा प्रसाद करून कार्यक्रमाची सांगता केली जाते. देशमुख कुटुंबातील मंडळी ५ दिवस या कार्यक्रमासाठी जातीने उपस्थित असतात. नविन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा व प्रथा आहे.
देशमुखांकडे हा महालक्ष्मी उत्सव गेल्या ३१० वर्षांपासून होत असल्याचे गावकरी सांगतात. हि परंपरा ऐतिहासिक राजे भोंसले कालीन असल्याचे सांगतात या दिवशी गावकरी दिवाळीचा सण समजून जावई व मुलींना घरी बोलावून देशमुखांकडील महालक्ष्मीच्या दर्शनाला पाठवितात. पूर्वी हा सन देशमुखाकडील ऐतिहासिक गडीमध्ये आयोजीत करण्यात येत असे ही गढी संत बगाजी सागर धरणात गेलेली आहे. गढीला १०० फुट उंच ४ मोठे बुरुज होते. पूर्वेकडील बुरुजाजवळील चौकात महालक्ष्मी बसविल्या जात होती. तर ५ वर्षातून एकदा वर्धा नदी माय (पौराणिक नाव वशिष्ठा) महापुराचे निमित्याने देशमुखांच्या वाड्याला आंघोळ घालून महालक्ष्मीचे दर्शन घेत असे. अशा प्रसंगाला गावकरी स्वतःला धन्य समजत असे.