वाढत्या तापमानाने भाजीपाला महागला!
By admin | Published: April 12, 2017 12:39 AM2017-04-12T00:39:35+5:302017-04-12T00:39:35+5:30
तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे.
नागरिकांना फटका : बाजारात आवक घटल्याने वधारले भाव
अमरावती : तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ४० ते ५० रूपये प्रतिकिलोवर पोहोचल्या आहेत.
शहरात भाजी बाजारपेठेत जिल्ह्यालगतच्या परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पत्ता कोबी, फुलकोबी, सांभार, पालक, मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते. यामुळे भाजीबाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून नाही पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात टमाटरची भरपूर आवक होऊ लागली होती. पण उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शहरात भाज्यांची आवक रोडावते आहे. शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली आहे. तसेच स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे दर दुप्पट झाले. केवळ पानकोबी, लवकी आणि कोहळे सध्याच्या तुुलनेत स्वस्त आहेत. उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी आहे. पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
कांद्याने दिला गृहिणींना दिलासा
सध्या जिल्ह्यासह व लगतच्या जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी बऱ्यापैकी येत आहे. यामुळे सध्या १० ते १५ रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या कांद्याने दिलासा दिला आहे. भविष्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बटाटासुद्धा येत्या काळात महागण्याची शक्यता आहे.
सध्या भाजीपाल्याच्या किमतीत चढ-उतार सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठेत भाजीपाल्यांची फारसी आवक नाही. त्यामुळे सध्या काही प्रमाणात भाज्यांचे दर वाढले आहे.
- गणेश मेश्राम, भाजीविक्रेता