भाजीपाल्याची आवक वाढूनही तेजी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:00 AM2020-10-13T05:00:00+5:302020-10-13T05:00:02+5:30
अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. परिणामी घाऊक व्यापारी मिळेल त्या भावात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आहेत.
इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक शेतकऱ्यांसह बाहेरगावाहून शेतकरी माल आणत असल्यामुळे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक सद्यस्थितीत वाढली आहे. मात्र, पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढ कायम आहे. डाळीचे दर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच तेजीत असल्याने भाजीपाल्याला अधिक पसंती दर्शविली जात आहे.
अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. परिणामी घाऊक व्यापारी मिळेल त्या भावात किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकत आहेत.
किरकोळ व्यापारी घरोघरी भाजीपाला विक्री करीत असताना अव्वाच्या सव्वा दराने तो ग्राहकांना विकत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत. हे दर मागील तीन वर्षांच्या तुलनेत अधिक भासत आहेत.
हिरवा भाजीपाल्याची आवक वाढली असून, पावसामुळे खराब होत असल्याने अर्धेअधिक फेकावे लागत आहे. त्यामुळे मुद्दल निघून उर्वरित माल अल्पदरात विकत असल्याची प्रतिक्रिया चिल्लर व्यापारी आसिफ शेख हिंमत यांनी दिली. पुढील सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.
येथून मालाची आवक
अमरावती बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बंगळुरु, उत्तर प्रदेश, जोधपूर, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड येथून भाजीपाल्याची आवक होते. सद्यस्थितीत आले औरंगाबादहून, आलू उत्तर प्रदेश, जोधपूरहून, फूलकोबी बुलडाणा, चिखलीहून, तुरई, कारले, सांबार नांदेड, बंगळुरु येथून येत असल्याची माहिती अडते अनंत टाके यांनी दिली.