अमरावतीत भाजीपाल्याला संचारबंदीचा फटका; कोथिंबीर २५०, टोमॅटो १५० रूपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 07:10 AM2021-11-17T07:10:00+5:302021-11-17T07:10:01+5:30

Amravati News गत चार दिवसांपासून शहरात संचारबंदी आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, दैनंदिन व्यवहारात मोठा परिणाम झाला आहे. मात्र, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

Vegetables cost high in Amravati | अमरावतीत भाजीपाल्याला संचारबंदीचा फटका; कोथिंबीर २५०, टोमॅटो १५० रूपये किलो

अमरावतीत भाजीपाल्याला संचारबंदीचा फटका; कोथिंबीर २५०, टोमॅटो १५० रूपये किलो

Next

गृहिणींचे बजेट कोलमडले, , बाजार समिती बंद

अमरावती : गत चार दिवसांपासून शहरात संचारबंदी आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, दैनंदिन व्यवहारात मोठा परिणाम झाला आहे. मात्र, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. रोजगार नसल्याने गरीब, सामान्यांचे हाल होत आहे. हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी दिनचर्या असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे.

अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत संचारबंदी आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला कुलूप लागले आहे. बाहेरील माल वाहतूक ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला, फळांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर झाला आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातून भाजीपाला शहरात विक्रीसाठी आलेला नाही. केवळ शहरानजीकच्या भागातून थोडाफार भाजीपाला कसाबसा घाऊक विक्रेते आणत असल्याचे वास्तव आहे. मात्र, मागणी जास्त आणि आवक कमी अशी भाजीपाल्याची वस्तुस्थिती आहे. गत चार दिवसातच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, डाळी वापराकडे गृहिणींचा कल वाढला आहे. भाजीच्या फोडणीसाठी लागणारी कोथिंबीर २५० रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे गरीब, सामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीपाला गेला आहे.

शहराच्या सीमेवर कडक तपासणी

शहराच्या सीमेवर कडक तपासणी सुरू आहे. त्यामुळे बाहेरून कोणताही माल, साहित्य आणता येणे शक्य नाही. शहरात जो काही भाजीपाला विक्रीसाठी आणला जात आहे, तो नजीकच्या ग्रामीण भागात उत्पादित होणारा आहे. तो देखील विक्रेते जीवावर उदार होऊन विक्रीसाठी आणत आहे. शहराच्या चारही बाजू सीमा पोलिसांनी वेढल्या आहेत. वाहने असो वा, व्यक्ती या सर्वांची तपासणी केली जात आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांवर ‘खाकी’ बरसत असल्याने बाहेर नको रे बाबा असे म्हणत अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.

असे आहे भाजीपाल्याचे प्रति किलो दर

टोमॅटो - १५०

बटाटे- ४०

वांगी -६०

भेंडी- ७०

तुरई - ६०

भेंडी- ८०

लवकी - ६०

कोथिंबीर- २५०

मिरची - १००

पालक - ८०

ढेमसे-६०

फुल कोबी- ८०

गवार - १२०

लसूण - १२०

गॅस सिलिंडर पावतीविना

संचारबंदीत इंटरनेट बंद आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्य वापराचे गॅस सिलिंडर आता पावतीविना दिले जात आहे. पैसे देऊनही गॅसची रक्कम किती?, हे हल्ली गृहिणींना कळेनासे झाले आहे. इंटरनेट बंदीमुळे अनेक व्यवहारांना फटका बसत आहे. मोबाईल केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. संचारबंदीत गॅस सिलिंडर चढ्या दराने विकल्या जात असल्याची ओरड आहे.

भाजीपाला खरेदी करावा की नाही?, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी, इंटरनेट बंदीमुळे अनेक कुटुंबांचे नियोजन बिघडले आहे. जीवनावश्यक वस्तू, साहित्याचे दर वधारले आहे. आता संचारबंदी उठवून पूर्वपदावर स्थिती यायला हवी.

- प्रतिभा चव्हाण, गृहिणी.

बाजार समिती बंद आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी कसा, कोठून आणावा, हा गंभीर प्रश्न आहे. रोजगार मिळविण्यासाठी नजीकच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांकडून भाजीपाला कसातरी विक्रीसाठी आणावा लागत आहे.

भाऊराव बोरकर, भाजीपाला विक्रेते

Web Title: Vegetables cost high in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.