वरूडमध्ये भाजीपाला, दूध, किराण्याची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:02+5:30
शहरातील तीन किमी परिसर कंटेनमेंट झोनमध्ये आल्याने जीवनावश्यक वस्तंूसह सर्व सुविधा बंद करण्यात आल्या. केवळ वैद्यकिय सुविधा सुरू आहेत. यामुळे शहरात भाजीपाला, दूध, किराणा दुकाने तिन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. परिणामी वरूडच्या नागरिकांनी आजूबाजूच्या गावांमध्ये भाजीपाल्याकरीता गर्दी केल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरू ड : येथील एका महिलेसह तिच्या दोन्ही मुली कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याने तीन किलोमीटर परिसर हा कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. त्यामुळे शहरात स्मशानशांतता पसरली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वानवा जाणवू लागली आहे.
शहरात ग्रामीण भागातून येणारे दूधही बंद झाले आहे. नगर परिषदेने घरपोच सुविधा पुरविण्याची हमी दिली. मात्र, त्यालाही मर्यादा आल्या आहेत. ६ मेपासून घरपोच भाजीपाला, किराणा मिळणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील तीन किमी परिसर कंटेनमेंट झोनमध्ये आल्याने जीवनावश्यक वस्तंूसह सर्व सुविधा बंद करण्यात आल्या. केवळ वैद्यकिय सुविधा सुरू आहेत. यामुळे शहरात भाजीपाला, दूध, किराणा दुकाने तिन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. परिणामी वरूडच्या नागरिकांनी आजूबाजूच्या गावांमध्ये भाजीपाल्याकरीता गर्दी केल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे.
दरम्यान, महसूल, पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, शहरात सॅनिटायझेशन, जंतुनाशकाची धूरळणी सुरू केली आहे. जवाहर कॉलनी, शासकीय गोडावून आणि सिंचन वसाहतीचा परिसर सील करून कोणालाही आत-बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तीन किमीच्या कंटेनमेंट झोनमध्ये ये-जा करण्यास बंदी असल्याने शहरातील सर्व दुकाने, अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक सेवा बंद आहेत. त्यामुळे ६ मेपासून शहरात भाजीपाला, किराणा विक्री घरपोच सुरू आहे.
-रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, वरूड