ओएलएक्सवरून वाहन क्रमांकाची उचलेगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:26+5:302021-06-22T04:10:26+5:30
प्रदीप भाकरे अमरावती : ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दुचाकी चोरांच्या चौकशीदरम्यान रोज नवनवीन खुलासे होत आहेत. चोरीच्या दुचाकी ...
प्रदीप भाकरे
अमरावती : ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दुचाकी चोरांच्या चौकशीदरम्यान रोज नवनवीन खुलासे होत आहेत. चोरीच्या दुचाकी बनावट आरसी तयार करून विकल्या जात होत्या. त्यासाठी आरोपी सरफराज मन्सूर अली शाह याने ओएलएक्स या अॅपवरून वाहन क्रमांकाची उचलेगिरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ओएलएक्स या अॅपवर जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. जुनी वाहनेदेखील क्रमांक व अन्य माहितीसह तेथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्या अॅपवर विक्रीसाठी असलेल्या दुचाकीचा मूळ क्रमांक घेऊन सरफराज हा बनावट आरसी तयार करायचा. मालकाचे बनावट आधार कार्डदेखील बनवून द्यायचा, ती कागदपत्रे मूळ असल्याची भासवून एजंटद्वारे चोरीची दुचाकीची विल्हेवाट लावली जायची, असा गौप्पस्फोट आरोपींनी कोठडीदरम्यान केला आहे.
शिरजगाव बंड येथील आरोपी सरफराज याचे वडील मुंबईत खासगी काम करतात. तो देखील मुंबईत कॉल सेंटरवर काम करायचा. कोरोनाकाळात तो गावी परतला. कामधंदा नाही, म्हणून इंटरनेटची कामे करायचा. त्यातून गावातीलच नौशाद अली याच्याशी त्याची सलगी झाली. बनावट आरसी व बनावट आधारकार्ड बनवून देण्यापोटी त्याला चांगली रक्कम मिळू लागली. आणि त्याचा गोरखधंदा चांगलाच वाढू लागला. मात्र, सहा महिन्यातच त्याचे बिंग फुटले. प्रत्यक्ष चोरीत सहभागी नसलेला सरफराज गजाआड गेला.
जप्त दुचाकींची संख्या पोहोचली ४७ वर
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून आणखी १८ दुचाकी जप्त करण्यात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांना यश आले. त्यामुळे जप्त दुचाकींची संख्या ४७ वर, तर अटक आरोपींची संख्या नऊझाली, तर एक आरोपी पसार आहे.
----------
अशी आहे चोरीची पध्दत
दुचाकीवर येऊन आधी रेकी करायची. चोरीसाठी वाहन निश्चित करायचे, बनावट चावीच्या गुच्छ्यातून चावी लावून पाहायची, लागलीच, तर ती दुचाकी घेऊन पळ काढायचा. ती एजंटपर्यंत पोहोचून द्यायची, अशी या टोेळीची चोरीची पध्दत. तो बनावट चावीचा गुच्छा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
----------
नौशादअली खरा सूत्रधार
चांदुरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, परतवाडा, मोर्शी, शिरखेड व बडनेरासह यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपींनी दुचाकी चोरल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार नौशाद अली रहमान शाह (२७, शिरजगाव बंड) हा असल्याची पोलीस तपासात समोर आले आहे. बनावट आरसी बनवून देणारा आरोपी सरफराज मन्सूर अली शाह हा त्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे.
-----------
कोट
आतापर्यंत अटक आरोपींच्या कबुलीजबाबानुसार, ४७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. एक आरोपी पसार आहे.
- संजय शिंदे,
तपास अधिकारी,
ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाणे
--------