विदेशी पॅटर्नच्या ‘ट्रॅक’वर वाहन चालक प्रशिक्षण
By admin | Published: April 3, 2015 12:01 AM2015-04-03T00:01:46+5:302015-04-03T00:01:46+5:30
केंद्रिय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे वर्दळीच्या रस्त्यावर नव्हे तर
अमरावती: केंद्रिय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे वर्दळीच्या रस्त्यावर नव्हे तर सुरक्षित स्थळी मिळावे, यासाठी विदेशी पॅटर्ननुसार सर्व सोयींयुक्त पाच एकर जागेवर ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षणाचा ट्रॅक निर्माण केला जाणार आहे. त्याकरीता ड्रायव्हिग स्कुलच्या संचालकांनी जागेची चाचपणी सुरु केली असून लवकरच मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
हल्ली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे प्रचलित पद्धतीने वर्दळीच्या रस्त्यावरच दिले जाते. मात्र, ही बाब प्रशिक्षित वाहन चालकांच्या जीवावर बेतणारी ठरण्याची भिती केंद्रिय भुपृष्ठमंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्यानुसारमोटर वाहन अधिनियम कायद्यात ड्रायव्हिंग स्कुलसाठी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देताना पाच एकर जागेवर ट्रॅक निर्माण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नवीन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, ही जबाबदारी राज्य शासनावर सोपविली आहे. परिणामी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आता रस्त्यावर देण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहन चालविण्यासंदर्भात आवश्यक असलेल्या सोयीसुविधा स्वतंत्र ट्रॅक मध्येच निर्माण करण्याचे निर्देश आहेत.
काही दिवसांपुर्वी ना. नितीन गडकरी यांची काही ड्रायव्हिंग स्कुलच्या संचालकांनी भेट घेवून त्यांच्या पुढ्यात अडीअडचणी मांडल्यात. परंतु वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे ट्रॅकवर दिले जाईल, यात कोणतीही तडजोड नाही, अशा स्पष्ट शब्दात गडकरींनी ड्रायव्हिंग स्कुलच्या संचालकांना सांगितले. त्यामुळे भविष्यात उद्भवणारी समस्या लक्षात घेता यावर उपाययोजना म्हणून जिल्हाभरातील ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक एकत्रित आलेत. समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी महासंघ स्थापन देखील केला आहे.
सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र ट्रॅकची निर्मिती करणे असल्यामुळे ती लवकर कशी सोडविता येईल, यासाठी संचालकांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.
शहरापासून काही अंतरावर हे ट्रॅक निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याकरीता जागेचा शोध घेतला जात आहे. पाच एकर जागा खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम गोळा करण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या निकषानुसार ट्रॅक निर्माण करावा लागणार असून विदेशात वाहन प्रशिक्षण देताना आवश्यक त्या उपाययोजना ड्रायव्हिंग स्कुलच्या संचालकांना कराव्या लागणार आहेत.
आरटीओत दलालांना
रान मोकळे
परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओतून दलाल हद्दपार करण्याची मोहिम राबविली असली तरी त्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने लगाम लावली आहे. हल्ली आरटीओत दलालांची गर्दी वाढली असून ते बिनदक्कतपणे कामे करीत आहे. ही बाब सामान्य नागरिकांची लूट करणारी ठरत आहे. आरटीओत सद्या दलालांची संख्या देखील वाढली आहे.
केंद्र शासनाच्या मोटर वाहन अधिनियमात वाहन चालविण्याचे प्रशिक्षणासाठी ट्रॅक आवश्यक आहे. त्याकरीता पाच एकर जागा खरेदी करणे, ड्रायव्हिंग स्कुलच्या संचालकांना एकत्रित करणे, यासाठी महासंघ स्थापन करण्यात आला आहे. नवीन कायदा लागू झाला नसला तरी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे आता ट्रॅकवर दिले जाणार आहे.
प्रभाकर बारसे
संचालक, बारसे ड्रायव्हिंग स्कूल