आरटीओतून ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने काढली बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:10+5:302021-09-03T04:14:10+5:30
आता वाहने लावल्यास कारवाई, आरटीओचा दणका (फोटो आहेत.) अमरावती : आरटीओ परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी अनाधिकृत ओम्नी वाहनरूपी ...
आता वाहने लावल्यास कारवाई, आरटीओचा दणका
(फोटो आहेत.)
अमरावती : आरटीओ परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी अनाधिकृत ओम्नी वाहनरूपी स्टॉल प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी कारवाईचा बडगा उगारत बाहेर काढले. या वाहनांनी आरटीओची जागा व्यापली होती. यासंदर्भात बुधवारच्या अंकात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित होताच कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
आरटीओच्या आतील परिसरात ऑनलाईन अर्ज भरून देणारी वाहने लागल्यास चालकांवर कारवाई करून अशी वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बजावले आहे. आरटीओत नेहमीच बाहेरील दलालांचा सुळसुळाट असतो तसेच येथे ३० ते ४० ओम्नी व्हॅन उभ्या ठेवून त्यात ऑनलाईन अर्ज भरून देण्याचा व्यवसाय थाटला होता. आरटीओत कुठलेही काम असो, या एजंट कम दलालांकडेच नागरिकांना संपर्क साधावा लागत होता. आरटीओत कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांना वाहने ठेवायलासुद्धा जागा शिल्लक नव्हती. नजर टाकावी तेथे एजंटांनी आरटीओची जागा व्यापून घेऊन आपला व्यवसाय थाटला होता. हा प्रकार ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडताच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही वाहने बाहेर काढण्याचे आदेश एआरटीओ व संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना दिले. त्यानुसार गुरुवारी कारवाई करण्यात आली.