जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या 'एसएनसीयू'त व्हेंटिलेटर जळाले, एक शिशू दगावला
By गणेश वासनिक | Published: September 25, 2022 11:05 PM2022-09-25T23:05:52+5:302022-09-25T23:07:00+5:30
एसएनसीयू विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर असून, दोन व्हेंटिलेटर हे महिनाभरापूर्वीच शासनाकडून रुग्णालयाला प्राप्त झाले होते.
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील एसएनसीयू विभागातील व्हेंटिलेटरला रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी तातडीने एसएनसीयू विभागातील नवजात शिशूंना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. यामध्ये १२ नवजात शिशूंचा समावेश असून, यात दोन शिशू हे आधीच व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. उपचारादरम्यान सांयकाळी साडेसात वाजता एक शिशू दगावला. व्हेंटिलेटरला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. या घटनेमुळे ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अग्निकांडाची आठवण ताजी झाली, हे विशेष.
डफरीन रुग्णालयातील ‘एसएनसीयू’ विभागात गंभीर व कमी वजनाच्या बालकांवर उपचार केले जातात; परंतु या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा या अपुऱ्या आहेत. रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील एका व्हेंटिलेटरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यावेळी या ठिकाणी एकूण ३७ शिशू उपचारासाठी दाखल होते. व्हेंटिलेटरने पेट घेताच कर्तव्यावर दाखल सलमा नामक या परिचारिकेने व्हेंटिलेटरवर असलेल्या नवजात शिशूला उचलून बाजूला केले. आगीमुळे एसएनसीयू विभागात सर्वत्र धूर पसरला होता. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने अग्निशमन यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले. व्हेंटिलेटरवर असलेले शिशू गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालय प्रशासनाने डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालय प्रशासनाने एकूण १२ शिशूंना शहरातील इतर रुग्णालयात, तर २५ बालकांना रुग्णालयातच इतर वॉर्डांमध्ये ठेवण्यात आले आहे.
महिनाभरापूर्वीच आले व्हेंटिलेटर
एसएनसीयू विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर असून, दोन व्हेंटिलेटर हे महिनाभरापूर्वीच शासनाकडून रुग्णालयाला प्राप्त झाले होते. याच नवीन व्हेंटिलेटरमधील एका व्हेंटिलेटरला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सदर व्हेंटिलेटर हे शनिवारी रात्रीपासून चालू-बंद होत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
एसएनसीयू विभागाची क्षमता २७, दाखल ३७
शॉर्टसर्किट होतोच कसा?
डफरीन येथील एसएनसीयू विभागात यापूर्वीही अशाच प्रकारे शॉर्टसर्किट झाले होते. बीएमसीकडून रुग्णालयातील फायर ऑडिट झाल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी दिली. त्यामुळे रुग्णालयात शॉर्टसर्किट होतो कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे व्हेंटिलेटरला आग लागली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन नव शिशूंना तातडीने इतर रुग्णालयात हलविले. मात्र सायंकाळी साडेसात वाजता एक शिशू दगावला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार याप्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक